पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या ऊसदरवाढीच्या आंदोलनाला विविध ठिकाणी मिळत असलेल्या प्रतिसादामुळे पुणे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे बुधवारी (ता. २५) बारामती येथे होणाऱ्या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. दुसरीकडे, गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या वाढलेल्या दरामुळे साखर उद्योगातील आर्थिक गणितेही बदलली आहेत. साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादकांना मिळणाऱ्या दराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शेट्टींच्या आंदोलनाची धग बारामतीत
राजू शेट्टी सोमवारी (ता. २३) अहिल्यानगर येथे आंदोलन करणार असून, त्यानंतर बुधवारी (ता. २५) त्यांचा मोर्चा पुणे जिल्ह्याकडे वळणार आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी सध्या प्रतिटन ३,५०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. मात्र, राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये उसाला प्रतिटन ३,९०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने पुण्यातील शेतकऱ्यांकडूनही दरवाढीची मागणी जोर धरत आहे. यंदा साखर कारखाने नेहमीच्या नोव्हेंबर महिन्याऐवजी १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले. कारखाने लवकर सुरू केल्यास उसाचे वजन आणि साखर उतारा कमी मिळण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम कारखान्यांच्या उत्पादनावर आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होऊ शकतो, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मांडली होती.कारखाने लवकर सुरू करायचे असतील तर साखरेचा किमान विक्री दर आणि इथेनॉलचे दर वाढवावेत, उसाची एफआरपी प्रतिटन ४,५०० रुपयांपर्यंत करावी, यासह विविध मागण्या संघटनेने सरकारसमोर ठेवल्या आहेत.
कोल्हापूरसह तीन जिल्ह्यांत ३,९०० रुपयांपुढे दर
ऊसदराच्या प्रश्नावर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत कारखान्यांनी जाहीर केलेल्या दरांमुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी प्रतिटन ३,९०० रुपये पहिली उचल, हंगाम संपल्यानंतर १०० रुपये आणि साखरेचा दर ४५ रुपयांपेक्षा अधिक राहिल्यास आणखी २०० रुपये देण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यामुळे उसाचा एकूण दर प्रतिटन ४,२०० रुपयांपर्यंत जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी प्रतिटन ३,९०० रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर केले आहे. सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनीही प्रतिटन ३,९०० रुपये दर जाहीर केला आहे. मात्र, पुढील हप्त्यांबाबत कारखान्यांकडून स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आलेली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली आंदोलनाची भूमिका कायम ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर बारामती येथील आंदोलनात राजू शेट्टी कोणती भूमिका मांडतात आणि पुणे जिल्ह्यातील ऊसदराच्या प्रश्नावर काय तोडगा निघतो, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

















