धाराशीव : यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडू लागल्याने उसाचे पीक सुकू लागले आहे. ऊस क्षेत्र अधिक आणि कारखान्यांकडून गाळपाला विलंब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशा स्थितीत कळंब तालुक्यातील मोहा येथील शेतकरी गणेश मडके यांच्यासमोरही उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, हातात आलेले पीक वाया जाऊ देण्याऐवजी त्यांनी त्यापासून जनावरांसाठी चारा तयार करण्याचा निर्णय घेतला. सध्या दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या प्रयोगातून शेताचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गाळपाअभावी सुकणाऱ्या उसापासून मुरघास तयार करून चारा विक्री सुरू केली. दीड एकरातील उसापासून २० टन मुरघास तयार करून ७,००० रुपये प्रतिटन दराने एक लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचा मार्ग त्यांनी शोधला.
शेतकरी गणेश मडके यांनी स्वतःच्या शेतातील दीड एकर उसापासून २० टन मुरघास तयार केला. प्रतिटन सात हजार रुपये दराने त्याचे एक लाख ४० हजार रुपये झाले. यापैकी १७ ते १८ टन मुरघासाला पशुपालकांकडून मागणीही पूर्ण झाली आहे. व्यवस्थित पॅक केलेला मुरघास पाच ते सहा महिने टिकत असल्याने पशुपालकांसाठी तो उपयुक्त ठरत आहे. याबाबत मडके म्हणाले की, माझ्याकडे चार एकर ऊस होता. मात्र, कमी पावसामुळे मागील तीन महिन्यांपासून बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने दीड एकरातील ऊस पूर्णपणे सुकण्याच्या स्थितीत आला. अडीच एकर ऊस कारखान्याला दिला; तर उर्वरित उसावर प्रक्रिया करून मुरघास तयार करण्याचा निर्णय घेतला. मुरघासनिर्मितीची माहिती घेण्यासाठी आधी उपळा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मुरघास निर्मिती केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.


















