दुष्काळाची झळ: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये उसाचे क्षेत्र घटून सरासरीच्या केवळ २० टक्क्यांवर

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईचा फटका आता ऊस शेतीला बसू लागला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये यंदा उसाची लागवड सरासरी क्षेत्राच्या केवळ २० टक्क्यांपर्यंत घसरली आहे. ‘लोकमत टाइम्स’च्या वृत्तानुसार, पाण्याची तीव्र कमतरता असल्याने शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी केले आहे.

या तिन्ही जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सरासरी १ लाख ३९ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली जाते. मात्र, यंदा दुष्काळसदृश परिस्थिती आणि जलसाठ्यांमधील पाण्याची पातळी घटल्यामुळे ऊस लागवडीवर विपरीत परिणाम झाला आहे. नद्या, नाले आणि सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. नोव्हेंबर महिन्यापासूनच अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

तीन जिल्ह्यांतील उसाचे सरासरी क्षेत्र

मराठवाड्यातील या तीन जिल्ह्यांमध्ये उसाचे सरासरी लागवड क्षेत्र छत्रपती संभाजीनगर : २९ हजार १९५ हेक्टर,जालना : ४१ हजार १६१ हेक्टर, बीड : ६९ हजार ४४१ हेक्टर इतके आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा उसाच्या चारही प्रकारांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. यामध्ये आडसाली, पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा या उसाच्या प्रकारांचा समावेश आहे.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा आडसाली उसाची लागवड केवळ १ हजार २०१ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. तर पूर्वहंगामी उसाचे क्षेत्र ३ हजार २१६ हेक्टर आणि सुरू उसाचे क्षेत्र ६ हजार ५४ हेक्टर इतके नोंदविण्यात आले आहे.याशिवाय, खोडवा उसाचे क्षेत्रही घटून सुमारे १५ हजार ८३६ हेक्टर राहण्याचा अंदाज आहे. सामान्यतः एकूण ऊस उत्पादन क्षेत्रात खोडवा पिकाचा मोठा वाटा असतो. मात्र, पाणीटंचाईचा फटका या पिकालाही बसला आहे.

उसाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांची घट

पाणीटंचाईचा परिणाम केवळ ऊस लागवडीच्या क्षेत्रावरच झाला नसून उत्पादन क्षमतेवरही झाला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा उसाच्या उत्पादनात नेहमीच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. या भागात साधारणपणे प्रतिहेक्टरी ५० ते ६० टन उसाचे उत्पादन मिळते. मात्र, यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

गोदावरी नदीकाठच्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा

गोदावरी नदीच्या पट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुलनेने कमी नुकसान झाले आहे. या भागात सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता काही प्रमाणात चांगली आहे. मात्र, पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकरी उभे असलेले ऊस पीक पूर्णपणे वाळण्यापूर्वीच तोडण्याच्या तयारीत आहेत.

खरीप हंगामातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

मान्सूनच्या अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातच शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यात आता उसाचे लागवड क्षेत्र घटणे आणि उत्पादनात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी अधिक वाढल्या आहेत.मराठवाड्यात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पाणीटंचाईमुळे शेतीच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. लवकरच सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणखी मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here