बेळगाव : सतीश शुगर्सने जपली ग्रामीण परंपरा, सरदार्स मैदानावर २५ जानेवारीपासून शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन

बेळगाव : सतीश जारकीहोळी फाउंडेशनने मुंबईतील इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेखाली १३व्या ‘मिस्टर सतीश शुगर्स क्लासिक-२०२७’ दक्षिण भारतस्तरीय व बेळगाव जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे. कॉलेज रोडवरील सरदार्स हायस्कूलच्या मैदानावर २५ व २६ जानेवारी २०२७ रोजी ही स्पर्धा होईल. दक्षिण भारतस्तरीय स्पर्धेत कर्नाटक, पुद्दुचेरी, केरळ, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथील स्पर्धक दहा वजनी गटांत सहभागी होणार आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या पाच विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, २० हजार, १६ हजार, १५ हजार आणि १२ हजार रुपये देण्यात येतील. याशिवाय दक्षिण भारत किताब विजेत्याला तीन लाख रुपये, प्रथम उपविजेत्याला एक लाख आणि द्वितीय उपविजेत्याला ५० हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू मंजू मोगवीर हे स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहेत.

दक्षिण भारत शरीरसौष्ठव संघटना, कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि जीटीबीबीए यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. मंत्री व केएबीबीचे प्रमुख सतीश जारकीहोळी यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या स्पर्धेमुळे बेळगावच्या शरीरसौष्ठव क्षेत्राला व्यासपीठ मिळणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा सात वजनी गटांत होईल. प्रत्येक गटातील विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, १२ हजार, १० हजार, चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी प्रत्येकी ८ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय किताब विजेत्याला दीड लाख रुपये, प्रथम उपविजेत्याला ७५ हजार आणि द्वितीय उपविजेत्याला ५० हजार रुपये रोख पारितोषिकासह चषक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. रविवारी यमकनमर्डी येथे स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी राहुल जारकीहोळी, किरण राजपूत, रियाज चौगुले, सुरेश जोरापूर, अजित सिद्दण्णावर आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here