जालना : अंबड, घनसांगवीत ऊस मिळविण्याची स्पर्धा, कर्मयोगीकडून ३१०० तर ‘समृद्धी’कडून ३२०० रुपये दर जाहीर

जालना : सध्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यांतील साखर कारखान्यांमध्ये ऊस मिळविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. उसाची उपलब्धता कमी असल्याने खासगी आणि सहकारी कारखान्यांकडून उचल जाहीर करण्याबरोबरच एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याचे संकेत दिले जात आहेत. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक एक आणि दोनने २०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी प्रतिटन ३१०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. त्यापोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर १२६ कोटी रुपये जमा केले आहेत. रेणुकानगर देवी दहिगाव येथील समृद्धी कारखान्याने प्रतिटन ३२०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. फेब्रुवारीतील गाळपावेळी उसाला प्रतिटन १०० रुपये अतिरिक्त अनुदान देण्याची घोषणाही केली आहे.

आमदार डॉ. हिकमत उढाण यांच्याशी संबंधित ब्लू सफायर फूड प्रोसेसिंग युनिटकडून गूळ पावडर निर्मितीसाठी घेतल्या जाणाऱ्या उसाची पहिली उचल अद्याप जाहीर झालेली नाही. या कारखान्याकडूनही दराबाबत घोषणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने धरणे आणि विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावली आहे. पाण्याअभावी उसाची वाढ खुंटली असून, ऊस क्षेत्रातही घट झाली आहे. त्यामुळे कारखान्यांसमोर पूर्ण क्षमतेने गाळप चालविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. याबाबत माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले की, पाणी टंचाईमुळे उसाचे क्षेत्र २० ते २५ टक्क्यांनी घटले. त्यामुळे कारखान्यांचे गाळप पूर्ण क्षमतेने चालविणे कठीण झाले आहे. साखरेचा बाजारभाव, इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध, वाढता वाहतूक खर्च यांचा ताळमेळ बसवताना अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन जास्त उचल देण्याचा प्रयत्न आहे. समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी ऊस उत्पादकांना चांगला दर, सर्वतोपरी सहकार्य देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here