अहिल्यानगर : जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी गौरी शुगरने पुढाकार घेतला असून, ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील यांनी हिरडगाव आणि ढवळगाव येथील दोन्ही युनिटसाठी प्रतिटन ३,७०० रुपये दर जाहीर केला आहे. यामध्ये ३,५०० रुपये पहिली उचल म्हणून दिले जाणार असून, उर्वरित २०० रुपये आणि मोफत साखर दिवाळीच्या सणाला देण्यात येणार आहे. या घोषणेमुळे जिल्ह्यातील ऊसदराच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादकांना प्रतिटन ३,५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गौरी शुगरने जाहीर केलेल्या दरामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदराच्या बाबतीत उत्तर आणि दक्षिण असे दोन विभाग मानले जातात. विशेषतः दक्षिण भागातील साखर कारखान्यांच्या दरांची तुलना पुणे जिल्ह्यातील बारामती ॲग्रो, दौंड शुगर, भीमाशंकर, निराणी ग्रुप, पाटस आणि अंबालिका या कारखान्यांच्या दरांशी केली जाते. दौंड शुगरने मागील आठवड्यात प्रतिटन ३,५०० रुपये पहिली उचल जाहीर केल्यानंतर ऊसदराची चर्चा अधिक तीव्र झाली होती.मात्र, साखरेचे बाजारभाव, इथेनॉल उत्पादन, सहवीज निर्मिती आणि आगामी आर्थिक गणितांचा विचार करून नगर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी अद्याप दर जाहीर करण्याबाबत सावध भूमिका घेतली होती. अशातच गौरी शुगरने थेट ३,७०० रुपयांचा दर जाहीर केल्याने इतर कारखान्यांसमोरही दराबाबत निर्णय घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
नागवडे कारखान्याच्या घोषणेकडे लक्ष
जिल्ह्यातील सक्षम सहकारी साखर कारखान्यांमध्ये नागवडे कारखान्याची ओळख आहे. गौरी शुगरने दर जाहीर केल्यानंतर आता नागवडे कारखाना ऊस उत्पादकांना किती दर देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनीही येत्या दोन दिवसांत दर जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. शेतकरी संघटनेचे आंदोलन, जिल्हा प्रशासनाची भूमिका आणि खासगी कारखान्यांमधील दराची स्पर्धा या पार्श्वभूमीवर यंदाचा गळीत हंगाम ऊसदराच्या मुद्द्यावरून अधिक चर्चेत आला आहे. गौरी शुगरच्या घोषणेनंतर जिल्ह्यातील इतर सहकारी आणि खासगी साखर कारखाने कोणती भूमिका घेतात, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न : बोत्रे-पाटील
“शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीच्या उद्देशाने ओंकार ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. यंदाच्या गळीत हंगामात गौरी शुगरच्या दोन्ही युनिटमधून ऊस उत्पादकांना प्रतिटन ३,७०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभर शेतकरी घेत असलेल्या कष्टाला योग्य मोबदला देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील यांनी सांगितले.
नागवडे कारखाना दरात मागे राहणार नाही : राजेंद्र नागवडे
“साखर उद्योग सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. बाजारपेठेतील चढ-उतार आणि सरकारी धोरणांमधील अनिश्चिततेमुळे साखर व्यवसायासमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. तरीही नागवडे कारखान्याने शेतकऱ्यांना शाश्वत दर देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यंदाही दराच्या बाबतीत कारखाना मागे राहणार नाही. येत्या दोन दिवसांत दर जाहीर केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये,” असे नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी स्पष्ट केले.


















