अहिल्यानगर : जिल्ह्यातील अद्यापही अनिर्णित असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज (दि. २७) सकाळी ११ वाजता महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत ऊसदराचा प्रश्न मार्गी लागणार का, याकडे शेतकरी आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शेतकरी संघटनांनी साखर कारखान्यांनी पहिली उचल प्रतिटन ३ हजार ७०० रुपये जाहीर करावी, अशी ठाम मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास २८ नोव्हेंबरपासून ऊस वाहतुकीची एकही गाडी कारखान्यापर्यंत पोहोचू दिली जाणार नाही, असा आक्रमक इशारा संघटनांनी दिला आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्याप ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पहिली उचल जाहीर केलेली नाही. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. २३) जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघटनांनी भव्य मोर्चा काढला होता. या आंदोलनात खासदार नीलेश लंके, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्यासह शेतकरी नेते रवींद्र मोरे, अनिल घनवट, रावसाहेब लवांडे आणि अभिजित पोटे सहभागी झाले होते.
या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी बैठकीसंदर्भात आदेश जारी केले आहेत. विशेष म्हणजे, ऊसदर निश्चितीच्या या बैठकीला कारखान्यांच्या अध्यक्षांनी स्वतः उपस्थित राहावे. मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा अन्य प्रतिनिधींना पाठवू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, आजच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. त्यामुळे ३ हजार ७०० रुपयांच्या पहिल्या उचलीवर आजच्या बैठकीत काय निर्णय होतो आणि ऊसदराचा तिढा सुटतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


















