कोल्हापूर : ऊसतोडणीसाठी आणलेली कामगारांची टोळी ऊसतोडीचे काम सुरू असतानाच रात्रीच्या सुमारास साहित्य घेऊन पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात उत्तूर येथील ऊस वाहतूकदार प्रवीण अशोक देसाई यांची तब्बल ७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.याप्रकरणी धनंजय देव काळे (रा. अरोळे वस्ती) आणि पप्पू रमेश वाघमारे (रा. खरडा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) या दोघांविरोधात फसवणुकीची फिर्याद देण्यात आली आहे.
प्रवीण देसाई यांनी ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर घेतला असून, तो एका साखर कारखान्याकडे वाहतुकीच्या कामासाठी लावला होता. ऊस वाहतुकीसोबतच ऊसतोडणीची जबाबदारीही त्यांच्यावर होती. त्यामुळे त्यांनी बाहेरील जिल्ह्यातून ऊसतोड कामगारांची टोळी आणण्यासाठी संबंधित ठेकेदारांना ७ लाख ५० हजार रुपये आगाऊ दिले होते.
त्यानुसार ३० महिला आणि पुरुषांचा समावेश असलेली ऊसतोडणी टोळी भादवन (ता. आजरा) येथे दाखल झाली. त्यानंतर टोळीने ऊसतोडणीचे काम सुरू केले. आतापर्यंत सुमारे ८० टन उसाची तोडणीही करण्यात आली होती. मात्र, काम सुरू असतानाच संबंधित टोळीने रात्रीच्या वेळी आपले साहित्य गोळा केले आणि कोणालाही काहीही न सांगता घटनास्थळावरून पोबारा केला.या प्रकारामुळे ऊस वाहतूकदार देसाई यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित टोळीचा शोध घेऊन आपली फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून द्यावी, तसेच या टोळीकडून अन्य शेतकऱ्यांचीही फसवणूक होऊ नये, अशी मागणी त्यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत केली आहे.


















