छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. संचालक मंडळ बरखास्त करून कारखान्यावर प्रशासक नियुक्त करण्याच्या विभागीय सहनिबंधक (साखर) यांच्या १८ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या आदेशाला न्यायालयाने बुधवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे सध्या संचालक मंडळाच्या बरखास्तीच्या कारवाईला ब्रेक लागला आहे.
न्यायमूर्ती मंजुषा अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने या प्रकरणी राज्य शासनाच्या सहकार विभागाचे सचिव, विभागीय सहनिबंधक आणि सहकार मंत्री यांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.अनुराधा तुपकरे यांच्यासह अन्य १३ संचालकांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. विशेष लेखापरीक्षकांच्या अहवालाच्या आधारे विभागीय सहनिबंधकांनी संचालक मंडळाच्या बरखास्तीबाबत खुलासा मागविला होता. त्यानंतर संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश देण्यात आला होता.
संचालक मंडळाच्या वतीने काय मांडण्यात आले?
याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ दिलीप पाटील बनकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. कारखान्याला भविष्यात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करणे हे केवळ काल्पनिक असून, मागील वर्षी ऊस उत्पादकांना निर्धारित दरानुसार पैसे देण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, लेखापरीक्षण अहवाल सादरच करण्यात आलेला नसताना सुधारात्मक उपाययोजनांचा प्रश्न उपस्थित होत नाही. संबंधित संघीय संस्थेचा अभिप्रायही विचारात घेण्यात आलेला नाही, असे मुद्दे त्यांनी न्यायालयासमोर मांडले.
दोन्ही बाजूंचे मुद्दे विचारात घेतल्यानंतर या प्रकरणातील सर्व बाबींवर सविस्तर सुनावणी होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले. त्यानंतर संचालक मंडळ बरखास्तीच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यात आली.अॅड. दिलीप पाटील बनकर यांना अॅड. स्वप्नील जोशी, अभिषेक पाटील आणि ओंकार शेंडकर यांनी सहकार्य केले. शासनाच्या वतीने मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी बाजू मांडली.
शेतकऱ्यांच्या याचिकेलाही अंतरिम दिलासा
दरम्यान, शेतकऱ्यांच्या वतीने अॅड. अभिजीत कुलकर्णी यांनी स्वतंत्र याचिका दाखल केली होती. सध्या ऊस गाळपाचा हंगाम सुरू असताना कारखान्यावर प्रशासक नियुक्त करणे योग्य नसल्याचा मुद्दा या याचिकेत मांडण्यात आला होता. या याचिकेवरही न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे.
१५ डिसेंबरच्या सुनावणीकडे लक्ष
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बरखास्तीला स्थगिती मिळाल्याने कारखान्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. आता राज्य शासनाची भूमिका काय असेल आणि १५ डिसेंबरच्या पुढील सुनावणीत न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


















