नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे उपाय केले आहेत. या उपाययोजनांच्या परिणामस्वरूप गेल्या काही दिवसांत एक्स-मिल साखरेच्या दरात सुमारे २० टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच किरकोळ बाजारातही साखरेचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
पीआयबीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पुरवठा साखळीत दरातील बदल सामान्यपणे पुढे पोहोचत असल्याने किरकोळ बाजारातील साखरेच्या किमतीतही एक्स-मिल दरानुसार लवकरच आणखी घट होण्याची शक्यता आहे. सरकार देशभरातील साखरेचे दर, साठा आणि बाजारातील साखरेची आवक-जावक यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. एक्स-मिल तसेच किरकोळ दरातील घसरणीवरून अलीकडे साखरेच्या दरात झालेली तीव्र वाढ प्रामुख्याने साठेबाजी आणि सट्टेबाजीमुळे झाल्याचे संकेत मिळत आहेत. देशात मात्र साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
सप्टेंबरपासून पंधरवड्याच्या आधारावर साखर कोटा व्यवस्था
सरकारच्या निदर्शनास आले आहे की, काही प्रकरणांमध्ये महिन्याच्या सुरुवातीला साखर कारखान्यांनी विकलेली साखर खरेदीदार महिन्याच्या अखेरीस उचलत होते. त्यामुळे बाजारात कृत्रिम टंचाईची परिस्थिती निर्माण होत होती.ही समस्या दूर करण्यासाठी आणि बाजारपेठेत साखर वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सप्टेंबरपासून पंधरवड्याच्या आधारावर साखर वाटप व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्यवस्था सध्याच्या मासिक कोटा पद्धतीची जागा घेणार आहे.नव्या व्यवस्थेनुसार, साखर कारखान्यांना मंजूर केलेल्या कोट्यापैकी किमान ४० टक्के साखर पहिल्या आठवड्यात विकावी लागणार आहे. उर्वरित साखर त्यानंतरच्या आठवड्यात विकावी लागेल.
प्रत्यक्ष पडताळणीत साखरेचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट
देशभरातील साखर कारखान्यांमधील साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेतही देशात साखरेचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट झाले आहे.अनेक ठिकाणी साखर कारखान्यांकडे सरकारला सादर केलेल्या मासिक अहवालात नमूद केलेल्या साठ्यापेक्षा अधिक साखर उपलब्ध असल्याचे आढळून आले.या पडताळणीत देशात साखरेची कोणतीही टंचाई नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे घाबरून साखर खरेदी करण्याचे किंवा गरजेपेक्षा जास्त साठा करून ठेवण्याचे कोणतेही कारण नाही.
काही ठिकाणी साखर कारखान्यांकडून शॉर्ट सेलिंग होत असल्याचेही आढळले. म्हणजेच, कारखान्यांना मंजूर केलेल्या मासिक कोट्यापेक्षा कमी प्रमाणात साखर विकली जात होती. प्रत्यक्षात पुरेसा साठा उपलब्ध असतानाही अशा प्रकारांमुळे बाजारातील साखरेचा पुरवठा अनावश्यकपणे मर्यादित होऊ शकतो.
नव्या व्यवस्थेमुळे सरकारला हे फायदे –
साखरेची मागणी आणि पुरवठ्यावर अधिक बारकाईने लक्ष ठेवता येईल.
बाजारातील परिस्थितीत बदल झाल्यास तातडीने निर्णय घेता येईल.
साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या प्रयत्नांना आळा बसेल.
गरज भासल्यास बाजारात पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यासाठी अतिरिक्त कोटा जारी करता येईल.
ही लवचिक व्यवस्था साखरेचा पुरवठा प्रत्यक्ष देशांतर्गत मागणीनुसार ठेवण्यास मदत करेल.
विक्रीनंतर सात दिवसांत साखरेची पाठवणी बंधनकारक
साखर कारखान्यांना यापूर्वीच निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी विकलेली साखर विक्रीनंतर सात दिवसांच्या आत कारखान्यातून पाठवणे (डिस्पॅच) बंधनकारक आहे.पंधरवड्याच्या आधारावर कोटा वाटप आणि सात दिवसांत साखरेची पाठवणी या दोन्ही उपायांमुळे पुरवठा साखळीतील साखरेची वाहतूक अधिक वेगाने होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कारखान्यांमधून वितरकांकडे आणि त्यानंतर ग्राहकांपर्यंत साखर लवकर पोहोचण्यास मदत होईल.यामुळे अनावश्यक साठवणूक आणि सट्टेबाजीसाठी साखर जमा करून ठेवण्यालाही आळा बसणार आहे. सरकारने मोठ्या प्रमाणात साखर वापरणाऱ्या ग्राहकांनाही त्यांच्या प्रत्यक्ष गरजेपेक्षा अधिक साठा करू नये, असे आवाहन केले आहे.
नव्या साखर हंगामामुळे उपलब्धता आणखी वाढणार
नवीन साखर हंगामासाठी गाळप १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात १० लाख टनांहून अधिक साखरेचे उत्पादन होण्याची सरकारला अपेक्षा आहे.नवीन हंगामातील साखर देशांतर्गत बाजारात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने ऑक्टोबरमध्ये उत्पादित साखर कोणत्याही निर्बंधाशिवाय विकण्यास साखर कारखान्यांना परवानगी दिली आहे. नोव्हेंबरमध्ये सुमारे ४५ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे देशांतर्गत वापरासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त साखर उपलब्ध होणार आहे.
देशात साखरेची टंचाई नाही; सरकारचे ग्राहकांना आश्वासन
सरकारने पुन्हा एकदा ग्राहकांना आश्वस्त केले आहे की, देशात साखरेची कोणतीही टंचाई नाही. आगामी सणासुदीच्या काळातही देशभरात योग्य दरात साखरेचा पुरेसा आणि सातत्यपूर्ण पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जातील.सरकारने साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि ग्राहकांना वाजवी दरात साखर उपलब्ध करून देण्यासाठी बाजारातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


















