नंदुरबार : ऊस दरवाढीच्या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाना व्यवस्थापन यांच्यात दराबाबत सहमती झाल्याने ऊस दराचा तिढा सुटला आहे. दोन्ही बाजूंनी एक पाऊल मागे घेत प्रतिटन ३ हजार ४११ रुपये दर निश्चित करण्यावर एकमत दर्शविले. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम पुन्हा सुरळीत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील आयान शुगर कारखान्याच्या परिसरात ऊस दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते. दरवाढीच्या मागणीमुळे ऊसतोडणी बंद ठेवण्यात आली होती. परिणामी साखर कारखान्यांचे गाळपही ठप्प झाले होते. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत तीन ते चार वेळा बैठका घेण्यात आल्या; मात्र सुरुवातीला कोणताही तोडगा निघाला नव्हता.
३ तारखेला नंदुरबार तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीत कारखाना व्यवस्थापनाने प्रतिटन ३ हजार २५० ते ३ हजार ३०५ रुपयांपर्यंत दर देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, शेतकऱ्यांनी पहिली उचल ३ हजार ६५० रुपये आणि दुसरी उचल ५०० रुपये देण्याची मागणी कायम ठेवल्याने ही बैठकही निष्फळ ठरली होती. अखेर सोमवारी झालेल्या चर्चेत दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेत प्रतिटन ३ हजार ४११ रुपये दर निश्चित करण्यावर सहमती दर्शविली. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची सांगता झाली. आंदोलनस्थळी उपस्थित शेतकऱ्यांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला. मंगळवारपासून साखर कारखान्यांचे गाळप नियमितपणे सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांना एकरकमी पेमेंटसह विविध मागण्या मान्य
ऊस दर निश्चितीबरोबरच शेतकऱ्यांनी इतर महत्त्वाच्या मागण्याही बैठकीत मांडल्या. शेतकऱ्यांना ऊस बिलाचे पेमेंट १५ दिवसांच्या आत देण्यात यावे, जळीत ऊस तोडणीला प्रथम प्राधान्य द्यावे, ऊसतोड कामगार आणि वाहनचालकांनी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे पैसे मागू नयेत, तसेच ऊस जाळून तोडणी करू नये, अशा मागण्यांचा समावेश होता. याशिवाय ऊस वजनाची पावती शेतकऱ्यांना तत्काळ उपलब्ध करून द्यावी, हार्वेस्टरच्या माध्यमातून ऊसतोड करताना ट्रॉलीमध्ये मर्यादित प्रमाणातच ऊस भरावा, अशाही अटी मांडण्यात आल्या. दोन्ही साखर कारखान्यांचे अधिकारी आणि खांडसरी कारखान्यांच्या प्रतिनिधींनी या मागण्यांना सहमती दर्शविली.
तसेच शेतकऱ्यांनी बाहेरून वजन करून आणलेल्या ऊसवाहनांचे वजन स्वीकारण्यासही कारखाना व्यवस्थापनाने मान्यता दिली. त्यामुळे ऊस दरासह वजन, तोडणी आणि पेमेंटसंदर्भातील प्रश्नांवरही सकारात्मक तोडगा निघाला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाना व्यवस्थापनाला मोठा दिलासा मिळाला आहे.


















