वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इराण यांनी दोन्ही देशांच्या लष्करी प्रतिनिधींमध्ये थेट संवादाची (डी-कॉन्फ्लिक्शन चॅनेल) व्यवस्था उभारण्यावर सहमती दर्शविली आहे. या माध्यमातून भविष्यातील संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी दिली.अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यवस्थेनुसार इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (CENTCOM) चे प्रतिनिधी कतारची राजधानी दोहा येथे तैनात राहतील.
ब्रिटिश वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्हान्स म्हणाले की, तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यातील मतभेद थेट चर्चेद्वारे सोडवण्यासाठी हा संवाद मार्ग तयार करण्यात येत आहे. दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी दोहा येथे नियमित बैठका घेऊन विविध वादांवर तोडगा काढतील. व्हान्स यांच्या म्हणण्यानुसार, इराणी अधिकाऱ्यांनी “आम्ही आयआरजीसीचा एक प्रतिनिधी दोहा येथे पाठवू आणि अमेरिकेच्या सेंटकॉमच्या प्रतिनिधीसोबत बसून प्रश्न सोडवू,” अशी भूमिका घेतली आहे. याशिवाय, संयुक्त अरब अमिराती (UAE) देखील इराण आणि आयआरजीसीशी विविध आर्थिक प्रोत्साहनांबाबत चर्चा करत असल्याचे व्हान्स यांनी सांगितले. त्यांच्या मते, अशा प्रकारचा संवाद यापूर्वी कधीच झाला नव्हता.
ही घडामोड लेक ल्युसर्न येथे झालेल्या तांत्रिक चर्चेनंतर अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या राजनैतिक संवादाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.दरम्यान, अमेरिका आणि गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल (GCC) यांनी बहरीनची राजधानी मनामा येथे झालेल्या मंत्रिस्तरीय बैठकीत आपल्या धोरणात्मक भागीदारीचा पुनरुच्चार केला. या बैठकीत प्रादेशिक सुरक्षा, इराणसोबतचा राजनैतिक संवाद, सीरिया व लेबनॉनमधील स्थैर्य तसेच गाझाच्या पुनर्बांधणीसाठी सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि बहरीनचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्लतीफ बिन राशिद अल झयानी यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. जीसीसी सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री आणि जीसीसीचे महासचिव जासेम अलबुदैवी यांनाही बैठकीला उपस्थिती होती.संयुक्त निवेदनानुसार, १७ जून रोजी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे (MOU) स्वागत करण्यात आले. तसेच पाकिस्तान आणि कतार यांनी केलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू ठेवत कायमस्वरूपी शांततेसाठी प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, इराणने अण्वस्त्र विकसित करू नये किंवा मिळवू नये, हा दोन्ही पक्षांचा समान उद्देश आहे. तसेच इराणची क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि प्रादेशिक सशस्त्र गटांना मिळणारे समर्थन यांसारख्या सुरक्षाविषयक आव्हानांवरही तोडगा काढणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.याशिवाय, हॉर्मूझ सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जहाजवाहतुकीसाठी निर्बंधमुक्त आणि सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या मार्गावर कोणतेही शुल्क, नियंत्रण किंवा अडथळे लादण्यास विरोध करण्यात आला. तसेच ओमान आणि आंतरराष्ट्रीय सागरी संघटना (IMO) यांनी ११ हजारांहून अधिक अडकलेल्या खलाशांच्या सुटकेसाठी तयार केलेल्या योजनेचे स्वागत करण्यात आले. संयुक्त निवेदनात असेही स्पष्ट करण्यात आले की, इराणसोबतचा व्यापार आणि गुंतवणूक ही सामंजस्य कराराच्या अटींचे पालन, प्रादेशिक अस्थिरता निर्माण करणाऱ्या कारवायांचा अंत आणि अंतिम कराराच्या अंमलबजावणीवर अवलंबून असेल.















