अहिल्यानगर : राज्यातील साखर कारखान्यांमध्ये ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या कामगारांच्या मजुरीत दर तीन वर्षांनी महाराष्ट्र राज्य साखर संघासोबत करार करून वाढ केली जाते. ४ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या करारानुसार ३४ टक्के दरवाढ देण्यात आली होती. या कराराची मुदत संपल्याने यंदाच्या गळीत हंगामापूर्वी नव्याने करार करून ऊसतोडणी आणि वाहतूक दरात वाढ करावी, अशी मागणी ऊसतोडणी वाहतूक, कामगार आणि मुकादम संघटनांची आहे. सद्यस्थितीत कामगारांनी ऊसतोडणी सुरू केली असली तरी कामगारांनी वाढीव मजुरीचा हक्क सोडलेला नाही. साखर संघाने तातडीने नवा करार करावा, अन्यथा ऊसतोड बंद करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे. राज्यातील अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, पुणे, सोलापूर, नांदेड, धाराशिव, लातूर परभणी यासह राज्यातील १२ लाख ऊसतोड कामगारांच्या मजुरीवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. संघटनांच्या म्हणण्यानुसार, ऊसतोड कामगार कामावर रुजू झाले असले तरी दरवाढीचा प्रश्न संपलेला नाही.
साखर संघाने ऊसतोडणी आणि वाहतूक दरात १०० टक्के वाढ देऊन नव्याने करार करावा, त्यासाठी मुख्यमंत्री आणि साखर संघाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कराराबाबत निर्णय न झाल्यास येत्या १ तारखेपासून ऊसतोड बंद आंदोलन पुकारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत जय महाराष्ट्र ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष बबनराव माने म्हणाले की, नव्याने करार करून ऊसतोडणी व वाहतूक दरात १०० टक्के वाढ करावी, अशी आमची साखर संघाकडे मागणी आहे. या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नाही. सध्या मजूर कारखान्यांवर गेले असले तरी साखर संघाने दरवाढीचा करार केला नाही, तर येत्या १ तारखेपासून ऊसतोड बंद आंदोलन पुकारणार आहोत. तर राज्य ऊसतोडणी कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीत शासनाने आणि साखर संघाने कामगारांच्या मजुरी दरात वाढ करावी, यासाठी आम्ही मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि साखर संघाकडे पाठपुरावा करत आहोत, असे स्पष्ट केले.


















