अहिल्यानगर : जिल्ह्यातील १२ साखर कारखानदारांनी थकवले जिल्हा बँकेचे २७०० कोटींचे कर्ज

अहिल्यानगर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखाने आहेत. हे साखर कारखाने बिगर शेती मतदारसंघात मोडतात. जिल्ह्यातील सहकारी कारखान्यांनी बँकेकडून जवळपास २ हजार ७०० कोटींचे कर्ज आहे. हे कर्ज कारखान्यांनी गेल्या वर्षीचा गाळप हंगाम सुरू करताना घेतलेले आहे. या कर्जाची कारखान्यांकडून अद्याप परतफेड झालेली नाही. जिल्ह्यातील सुमारे १२ हून अधिक सहकारी साखर कारखान्यांची ही थकबाकी आहे. त्यामुळे कारखानदारांनी आपल्या नावे ठराव न करता विकास सोसायट्यांच्या माध्यमातून निवडणुकीस उतरण्याचा मार्ग शोधला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी थकबाकीची प्रमुख अट आहे. बँकेचे ९० दिवसांपेक्षा अधिक काळ कर्ज थकविलेले असल्यास संबंधित सहकारी संस्थेचा ठराव रद्द करण्याची तरतूद आहे. कारखान्यांकडे ९० दिवसांपेक्षा अधिक काळ कर्ज थकलेले आहे. त्यामुळे बहुतांश सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या संचालकांनी कायद्याच्या कचाट्यातून पळवाट काढली. आपल्या तालुक्यातील विकास सोसायटीतून ठराव पाठविले आहेत. हे ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मंजूर झाले असून, कारखान्यांच्या संचालकांचा अंतिम मतदार यादीत समावेश आहे. कोणतीही स्थानिक स्वराज्य व सहकारी संस्थेची निवडणूक लढविताना थकबाकी भरून ना हरकत प्रमाणपत्र दाखल करावे लागते. त्यानंतरच निवडणूक लढविण्यास परवानगी मिळते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मात्र असा कोणताही निकष नाही. बँकेची निवडणूक लढविणारा उमेदवार ज्या कारखान्याचा पदाधिकारी आहे, त्या कारखान्याकडे थकबाकी आहे का, हा मुद्दा उपस्थित केल्यास अनेक संचालक अपात्र ठरू शकतात, मात्र, तसे होण्याची शक्यता कमीच आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here