अहिल्यानगर : देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रीतील गैरव्यवहाराच्या गुन्ह्याचा तपास पारनेर न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याचे आदेश यापूर्वी जून महिन्यात देण्यात आले होते. या प्रकरणात फिर्यादी असलेल्या कारखाना बचाव समितीने गुन्ह्याचे तपासात दिरंगाई आणि हलगर्जीपणा होत असल्याबाबत न्यायालयाकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जावरील सुनावणीअंती पारनेर न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश अनिल सोनवलकर यांनी या तक्रारीची दखल घेऊन पारनेर पोलिस निरीक्षक तथा तपासी अधिकारी सोमनाथ दिवटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून पुढील पंधरा दिवसांत या प्रकरणी खुलासा मागविला आहे, अशी माहिती कारखाना बचाव समितीचे विधिज्ञ अॅड. रामदास घावटे, अॅड. उन्मेश चौधरी यांनी दिली.
कारखाना बचाव समितीच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत दर पंधरा दिवसांनी केलेल्या तपासाचा प्रगती अहवाल न्यायालयाचे समोर ठेवण्याचे आदेश दिलेले होते. परंतु, पारनेर पोलिसांनी तपासाचा प्रगती अहवाल न्यायालयासमोर ठेवलेला नाही. त्यामुळे बचाव समितीने फिर्यादीत नमूद केलेल्या घटनेप्रमाणे पारनेर पोलिसांकडून तपास होत नाही. तपासात गुन्ह्यातील साक्षीदारांचे जबाब नोंदवणे बाकी आहे. गुन्ह्यातील प्रमुख मुद्देमाल हस्तगत करणे बाकी आहे. गुन्ह्यात वापरलेल्या कोट्यवधी रकमा शोधणे बाकी आहे, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती कारखाना बचाव समितीचे सदस्य साहेबराव मोरे यांनी दिली. समितीचे सदस्य बबन कवाद म्हणाले की, पुढील तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्याची कारखाना बचाव समितीची मागणी आहे. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी आमच्याकडे याबाबत अथवा खुलासा करावा, असे पत्र आलेले नाही. आमचा तपास सुरू आहे. स्वतंत्र तपास अधिकारी नेमला, तरी आमची काही हरकत नाही असे स्पष्ट केले.


















