अहिल्यानगर : मुळा साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. ही निवडणूक चार जागांसाठी होत आहे. यामध्ये करजगाव गटातील दोन जागा व महिला राखीव गटातील दोन जागांचा समावेश आहे. दरम्यान, कारखाना निवडणुकीत सत्ताधारी गडाख गटास आव्हान देणारे आमदार विठ्ठल लंघे- उद्योजक प्रभाकर शिंदे गट २१ पैकी फक्त तीन उमेदवार देण्यात यशस्वी झाले. मात्र, आज चिन्ह वाटपाच्या दिवशी महिला राखीव उमेदवार भानसहिवरे येथील मीराबाई दिवटे यांनी माजीमंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार मंडळास पाठिंबा दिला. घोडेगाव येथील कार्यकर्ते वसंत व राम सोनवणे यांनी हा समन्वय घडवून आणला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी गुरुवारी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर आज सकाळी करजगाव गट व महिला राखीव गटातील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हांचे वाटप केले. माजी मंत्री शंकरराव गडाख गटाच्या चार उमेदवारांस क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे बॅट चिन्ह मिळाले. तर विरोधी गटास किटली व कपबशी, तर अपक्ष उमेदवारास छत्री चिन्ह देण्यात आले आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार डॉ. ज्ञानेश्वर रामराव दरंदले, चंद्रकांत भानुदास टेमक यांना बॅट, तर किरण लक्ष्मण जाधव व नारायण दत्तात्रेय डौले यांना कपबशी चिन्ह देण्यात आले. अपक्ष उमेदवार गोरक्षनाथ मोहन जाधव यांना किटली तर महिला राखीव कमल चांगदेव दहिफळे व विमल नारायण सोनवणे यांना बॅट चिन्ह मिळाले. विरोधी गटातील उमेदवार मीराबाई भाऊसाहेब दिवटे यांना छत्री चिन्ह देण्यात आले. आमदार विठ्ठल लंघे व उद्योजक प्रभाकर शिंदे यांचे नेतृत्व मानणाऱ्या किरण जाधव व अन्य दोन उमेदवारांनी देवगड येथील भगवान दत्तात्रेयांचे दर्शन घेऊन प्रचारास सुरवात केली. तर गडाख गटाच्या उमेदवारांनी शनैश्वर व तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन सभासद भेटीला सुरवात केली आहे.


















