अहिल्यानगर : राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सुरू असल्याने जिल्ह्यातील सहकारातील निवडणुकांना ३१ मे पर्यंत ब्रेक लावण्यात आला आहे. त्यामुळे आता मुळा, ज्ञानेश्वर आणि वृद्धेश्वर कारखाना निवडणुकांची प्रक्रिया ‘आहे त्या टप्प्यावर’ थांबवली जाणार आहे. बारामतीसोबत नगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणूक सुरू असल्याने प्रशासन व पोलिस यंत्रणा व्यस्त राहणार आहे.
परिणामी, सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक मनुष्यबळ, पोलिस बंदोबस्त, मतदान केंद्राची उपलब्धतता याबाबतीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे, याचा अंदाज बांधून, अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम दि. ३१ मे २०२६ पर्यंत स्थगीत करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या वतीने अपर निबंधक तथा सहसचिव संतोष पाटील यांनी काढले आहेत.
दरम्यान, माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रभावाखालील मुळा सहकारी साखर कारखाना, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वातील ‘ज्ञानेश्वर’ तर राजळे यांच्याशी संबंधित वृद्धेश्वर कारखान्याच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु होती. ही प्रक्रिया आता काही काळासाठी लांबण्याची शक्यता आहे.


















