अहिल्यानगर : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत उपाध्यक्षपदी सर्वानुमते दिनार कुदळे यांची निवड करण्यात आली. कारखान्याचे मार्गदर्शक व माजी आमदार अशोक काळे आणि आमदार आशुतोष काळे यांनी कुदळे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक उपसंचालक संजय गोंदे यांनी काम पाहिले. बैठकीत उपाध्यक्षपदासाठी कुदळे यांच्या नावाची सूचना सुनील मांजरे यांनी मांडली, राजेंद्र घुमरे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी बोलताना मावळते उपाध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी कुदळे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना कुदळे म्हणाले की, कर्मवीर शंकरराव काळे आणि माजी आमदार अशोक काळे यांच्या नेतृत्वाचा वारसा या कारखान्याला लाभला आहे. तालुक्याचे सक्षम नेतृत्व, अशी ओळख असलेल्या आमदार आशुतोष काळे यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली. हा माझा सन्मान आहे. सर्वांना सोबत घेऊन जबाबदारी पार पाडू. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ व पदाधिकारी उपस्थित होते.


















