अहिल्यानगर : सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्यावतीने साहित्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना जीवन गौरव पुरस्काराने, तर संहिता राजन (पुणे), सुरेंद्र दरेकर (पुणे), मालती इनामदार (नारायणगाव), सचिन शिंदे (नाशिक), निवृत्ती जोरी (संगमनेर), संजय गोर्डे यांना (संगमनेर) विखे पाटील पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, विखे-पाटील यांनी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले. देशासमोर सहकाराचे प्रवरा मॉडेल उभे केले. ज्या भूमीतून देशात सहकार पसरला त्या भूमीला वंदन करण्यासाठी मी येथे आले आहे. पवार कुटुंबीयांचे आणि प्रवरेचे वेगळे नाते आहे. माझे चुलत सासरे विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक होते. यावेळी विश्वास पाटील म्हणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे मॉडेल प्रवरेच्या भूमीत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी उभे केले. विखे पुरस्कार प्राप्त झालेल्या सतरा साहित्यिकांना पुढे साहित्य अकादमी व वीस जणांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली यावरून या पुरस्काराचे महत्त्व लक्षात येते. कार्यक्रमाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष रावसाहेब कसबे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, शालिनी विखे पाटील, राजेंद्र विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, ध्रुव विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


















