अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत २६ मे ते २ जून पर्यंत आहे. दाखल अर्जांची छाननी ३ जून रोजी होईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १८ जूनपर्यंत आहे. पात्र उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप १९ जून रोजी होईल. तर निवडणुकीसाठी मतदान २६ जून रोजी होणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल २७ जून रोजी जाहीर केला जाईल. कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी जाहीर केला आहे. ही निवडणूक तहसील कार्यालय, पाथर्डी येथे नियुक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पार पडणार आहे.
विविध प्रवर्गातून एकूण १९ संचालकांची निवड केली जाणार आहे. कासार पिंपळगाव, चितळी, कोरडगाव, पाथर्डी आणि मिरी-टाकळी मानूर या गटांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. जवळपास आठ हजार सभासद असलेल्या या कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. तालुक्याचे राजकारण राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे यांच्या भोवती फिरत असते. राजळे कोणत्या विद्यमान संचालकांचा पत्ता कट करतात, कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी देतात याकडे कारखाना वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.


















