अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याकडून विक्रमी १ कोटी ४० लाख लिटर इथेनॉल निर्मिती

अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉलनिर्मिती प्रकल्पातून चालू हंगामात १ कोटी ४० लाख लिटर इथेनॉल निर्मिती पूर्ण केली आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, संचालक संपत गोडगे, सतीश वर्षे, विजय राहणे, लता गायकर, सुंदराबाई दुबे, हौशीराम सोनवणे, सचिव किरण कानवडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्शवादी शिस्तीवर कारखान्यासह सर्व संस्थांची वाटचाल सुरू आहे. कारखान्यात मद्यनिर्मिती न करता इंडस्ट्रिअल अल्कोहोलची निर्मिती केली जात असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.

थोरात म्हणाले की, मद्याऐवजी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांची शिस्त आणि आदर्श जपत थोरात सहकारी साखर कारखान्यात इंडस्ट्रिअल अल्कोहोलची निर्मिती केली जाते, असे असूनही कारखान्याची आर्थिक वाटचाल सक्षम आहे. सभासदांना कायम उच्चांकी ऊसदर देण्यात आला आहे. वीजनिर्मिती आणि इथेनॉल प्रकल्पामुळे कारखान्याला मोठी आर्थिक मदत होत असल्याचे सांगताना त्यांनी जागतिक परिस्थितीकडेही लक्ष वेधले. इथेनॉलचे महत्त्व संपूर्ण जगाला पटले आहे. देशात इथेनॉल निर्मिती करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांसाठी केंद्र सरकारने रास्त दर निश्चित करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष पांडुरंग घुले यांनी आभार मानले. यावेळी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here