अहिल्यानगर : पारनेर कारखाना विक्रीः दर पंधरा दिवसांनी तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश

अहिल्यानगर : देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या कथित विक्री घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासाबाबत पारनेर प्रथम वर्ग न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास न्यायालयाच्या थेट निगराणीत होणार असून, तपासाची प्रत्येक टप्प्यावरील माहिती न्यायालयाला नियमित सादर करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायाधीश मुबीन शेख यांनी सोमवारी (२९ जून) दिल्याचे दैनिक ‘पुण्यनगरी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. कारखाना बचाव समितीने दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने तपासातील विलंब, आरोपींविरोधात अपेक्षित कारवाई न होणे, महत्त्वाच्या पुराव्यांचा अभाव आणि तपासातील निष्क्रियता याची गंभीर दखल घेत पोलिसांकडून आतापर्यंत झालेल्या तपासाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. यापुढे दर पंधरा दिवसांनी तपासातील प्रगतीचा अहवाल न्यायालयात सादर करणेही पोलिसांसाठी बंधनकारक करण्यात आल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

या प्रकरणात वर्षभरापूर्वी पारनेर न्यायालयाने राज्य सहकारी बँकेचे दोन अधिकारी, क्रांती शुगर कंपनीचे नऊ संचालक आणि देवीभोयरेचे तत्कालीन तलाठी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र, त्यानंतर तब्बल दीड वर्षाचा कालावधी लोटूनही तपासात कोणतीही लक्षणीय प्रगती झालेली नसल्याचा मुद्दा कारखाना बचाव समितीने न्यायालयासमोर मांडला. अहमदनगर सत्र न्यायालयाने संबंधित आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले असतानाही त्यांना अटक करण्यात आलेली नसल्याचेही समितीने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे तपासाच्या निष्पक्षतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला.

ChiniMandi WhatsApp Channel

फिर्यादींनी गुन्हा दाखल झाल्यानंतर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल गायब झाल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे. याबाबत पारनेर पोलिसांनी पंचनामा केला असला, तरी तो मुद्देमाल अद्याप हस्तगत करण्यात आलेला नाही. तपासातील ही बाब समितीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.तपासासाठी ४२ महत्त्वाच्या साक्षीदारांची नावे पोलिसांना दिली होती. मात्र, दीड वर्ष उलटूनही या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आलेले नसल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. तपासातील ही मोठी त्रुटी असल्याचे समितीचे म्हणणे आहे. कारखाना बचाव समितीच्या वतीने अॅड. रामदास घावटे आणि अॅड. उन्मेश चौधरी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here