अहिल्यानगर : ऊस दरासाठी जिल्ह्यात संघर्ष सुरूच, शेतकरी सेनेकडून कारखानदारांच्या पुतळ्यांचे दहन

अहिल्यानगर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला, तरी अद्याप ऊसदर जाहीर झालेला नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून एकदा, तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत दोनदा बैठका झाल्या. मात्र या बैठकांकडेच साखर कारखानदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली. मात्र तरीही कारखानदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. काही साखर कारखान्यांनी दर जाहीर न करता ऊस बिले थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत. मात्र, हा दर अमान्य करत शेतकरी संघटनांनी आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे. कोल्हापूरच्या धर्तीवर दर देण्याच्या मागणीसाठी शिवसेना शेतकरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कारखानदारांचे पुतळे जाळून निषेध केला.

संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सर्वप्रथम ३२०० रुपये पहिली उचल जाहीर केली. काही कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा केल्याचे सांगण्यात येते. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा यंदा साखरेला एक हजार रुपये अधिक दर मिळत आहे. मग उसाला दर का देत नाहीत? असा सवाल शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केला. ते म्हणाले की, कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील उसाच्या साखर उताऱ्यात एवढा फरक पडतो का? अहिल्यानगर जिल्ह्यात साखर उतारा चोरला जात असून, शेतकऱ्यांना पैसे मिळू न देता कारखानदार मनमानी करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब फटांगरे, शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी सांगितले की, कोल्हापूरच्या धर्तीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखान्यांनी दर द्यावा, यासाठी सर्व शेतकरी संघटनांकडून आंदोलन उभारण्यात येणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here