अहिल्यानगर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन ५,००० रूपये भाव द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. या मागणीसह हंगामातील विविध समस्यांबाबत येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीकडे साखर कारखानदारांनी पाठ फिरवली.त्यामुळे शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त केला. ऊसदर, वाहतूक, वजनकाटे आदी विविध प्रश्नांवर प्रादेशिक साखर सहसंचालकांनी साखर कारखाना व शेतकरी संघटना प्रतिनिधींची आयोजित केलेली ही समन्वय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने काही शेतकरी संघटनांना बैठकीची पूर्वसूचना दिली नसल्याने उपस्थित पदाधिकार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. साखर कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक अथवा व्यवस्थापकीय संचालक बैठकीला उपस्थित नसल्यानेही संघटनांनी आक्षेप घेतला.
बैठकीत कारखाना प्रतिनिधींनी ऊसाला किती भाव देणार, याची ठोस घोषणा न केल्याने संतप्त शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांनी भाव जाहीर होईपर्यंत कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये, अशी मागणी केली. उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी, प्रादेशिक सहसंचालक गणेश पुरी, उपसंचालक संजय गोंदे, वजनमापे उपनियंत्रक अधिकारी रमेश दराडे, विशेष लेखापरिक्षक संतोष वाकचौरे व सतीष पोकळे तसेच शेतकरी संघटनेचे अभिजीत पोटे, रावसाहेब लवांडे, बाळासाहेब फटांगरे, मच्छिंद्र आरले आदी उपस्थित होते. कुकडी सहकारी साखर कारखान्याने सन २०२३ च्या गाळप हंगामातील प्रतिटन ७११ रूपये थकीत पेमेंट दिले नसून अनेक वाहतूकदारांचे पैसे थकीत आहे. आता थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेकडून कारखाना जप्त केल्याने आमच्या पैशाची हमी कोण घेणार यावरून शेतकरी संघटना, वाहतूकदार आक्रमक झाले. मात्र, बैठकीत ठोस निर्णय झाला नाही. मागील ऊस गाळप हंगामातील पहिले पेमेंट शेतकर्यांना मिळाले. मात्र, त्यानंतर साखरेला चांगला दर मिळाल्याने शेतकर्यांना प्रतिटन ५२५ रू. प्रमाणे दुसरे पेमेंट द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली. मात्र कारखाना प्रतिनिधींनी कारखान्यांना अपेक्षित फायदा झाला नसल्याचा दावा केला.


















