अहिल्यानगर : ऊस तोडणी महिलांच्या प्रश्नांबाबत उचल फाऊंडेशनतर्फे संवाद, सर्वेक्षण अभियान

अहिल्यानगर : मुंगुसवाडे येथे उचल फाउंडेशनतर्फे ऊसतोड कामगारांच्या सामाजिक, आर्थिक, मानसिक व आरोग्यविषयक समस्यांच्या अभ्यासासाठी आयोजित संवाद व सर्वेक्षण कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. अभिषेक भोसले, मानसशास्त्र संशोधक सायली सहस्रबुद्धे तसेच तैवान येथील सामाजिक कार्यकर्त्या पिन-चिएह लाई यांनी ऊसतोडणी कामगार महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या दैनंदिन जीवनातील विविध अडचणी जाणून घेतल्या. चर्चेदरम्यान बालविवाहाच्या प्रथेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. महिलांनी ऊसतोडणीमुळे होणारे प्रचंड शारीरिक श्रम, मुलांच्या शिक्षणात होणारे नुकसान, आर्थिक अस्थिरता, व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण आणि मानसिक ताण याविषयी आपले अनुभव मोकळेपणाने मांडले.

या चर्चासत्रात उचल फाउंडेशनचे कार्यकर्ते तसेच ५० हून अधिक ऊसतोडणी महिला कामगार सहभागी झाल्या होत्या. डॉ. भोसले हे लंडन येथील एसओएएस विद्यापीठात विकास अध्ययन या विषयात संशोधन करीत आहेत. स्थलांतरित मजूर आणि ग्रामीण श्रमिकांच्या प्रश्नांवर त्यांनी व्यापक अभ्यास केला आहे. सायली सहस्रबुद्धे या डब्लिन येथील ट्रिनिटी महाविद्यालयात ऊसतोडणी कामगार महिलांच्या मानसिक आरोग्यावर संशोधन करीत आहेत. पिन-चिएह लाई या तैवानमध्ये बालहक्क आणि स्थलांतर विषयांवर कार्यरत आहेत. यावेळी तोडणी कामगारांच्या प्रश्नांकडे केवळ मजुरीचा प्रश्न म्हणून न पाहता सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य, स्त्री सन्मान आणि मानवी हक्कांच्या व्यापक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे मत डॉ. अभिषेक भोसले यांनी व्यक्त केले. यावेळी महिलांचे कामाचे स्वरूप, सततचे स्थलांतर, असुरक्षित कामाचे वातावरण, आरोग्याच्या समस्या आणि सामाजिक परिस्थिती यावर चर्चा करण्यात आली. सचिन खेडकर यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here