सोलापुरात दुष्काळात जनावरांसाठी चारा वाचविण्यासाठी मजुरांमार्फतच होणार ऊसतोड; हार्वेस्टर मशीनच्या वापरावर निर्बंध

सोलापूर : जिल्ह्यात संभाव्य गंभीर चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने साखर कारखान्यांना हार्वेस्टर मशीनऐवजी मजुरांमार्फतच ऊसतोडणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, गाळप हंगाम सुरू होऊन बराच काळ उलटल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याने कोट्यवधी रुपयांची कर्जे काढून हार्वेस्टर खरेदी केलेल्या खासगी यंत्रमालकांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. कार्तिकेयन यांनी गुरुवारी (दि. ५) यासंदर्भात स्वतंत्र आदेश जारी केले. चालू वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसात खंड पडल्याने सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हार्वेस्टर मशीनद्वारे ऊसतोडणी केल्यास पाचट आणि जनावरांसाठी महत्त्वाचा चारा असलेले ऊसाचे वाढे शेतातच नष्ट होतात. याउलट, मजुरांच्या टोळ्यांमार्फत ऊसतोडणी केल्यास मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध होतो. त्यामुळे पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी साखर कारखान्यांनी हार्वेस्टरचा वापर टाळून मजुरांमार्फतच ऊसतोडणी करावी. तसेच उपलब्ध होणारे वाढे स्थानिक शेतकरी आणि पशुपालकांना तातडीने द्यावेत, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

जिल्ह्यात १८ लाखांहून अधिक पशुधन

सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये एकूण १८ लाख २२ हजार ३५४ पशुधन आहे. यामध्ये गाय, म्हैस, शेळी आणि मेंढी वर्गातील जनावरांचा समावेश आहे. तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात पुरेसा चारा उपलब्ध असल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनासमोर आता वैरण उपलब्धतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांमध्ये तसेच शेजारील राज्यांमध्ये कडबा वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पशुधन वाचविण्याच्या दृष्टीने ऊसतोडणी यंत्रांऐवजी मजुरांमार्फत करण्याचा प्रशासनाचा निर्णय योग्य असला, तरी तो घेण्यास झालेल्या विलंबामुळे हार्वेस्टर मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

ऐन हंगामात निर्णय; हार्वेस्टर मालकांचे आर्थिक गणित बिघडणार

जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आधीच सुरू झाला असून मोठ्या प्रमाणावर ऊसतोडणीही पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत ऐन हंगामात अचानक हार्वेस्टर मशीनच्या वापरावर निर्बंध घालण्यात आल्याने यंत्रमालकांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे. साखर कारखान्यांच्या गाळपासाठी वेळेत ऊस उपलब्ध व्हावा आणि तोडणी प्रक्रिया जलद व्हावी, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांनी बँकांकडून भरमसाठ व्याजदराने कोट्यवधी रुपयांची कर्जे घेऊन हार्वेस्टर मशीन खरेदी केली आहेत. या मशीनच्या कर्जाचे हप्ते प्रामुख्याने चालू गाळप हंगामातील ऊसतोडणीच्या उत्पन्नावर अवलंबून असतात.

आता हंगामाच्या मध्यावरच मशीन बंद ठेवण्याचे आदेश आल्याने बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्न यंत्रमालकांसमोर निर्माण झाला आहे. या संभाव्य आर्थिक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासन कर्जवसुलीला स्थगिती देणार का, याकडे हार्वेस्टर व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याची गरज महत्त्वाची असली, तरी पूर्वतयारीचा अभाव आणि ऐन हंगामात घेतलेल्या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यात प्रशासनाचे आदेश आणि हार्वेस्टर यंत्रमालकांची आर्थिक कोंडी, असा दुहेरी पेच निर्माण झाला आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here