अहिल्यानगर : अगस्ती सहकारी साखर कारखान्याची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, उपाध्यक्षा सुनिता भागरे, माजी सनदी अधिकारी बी. जे. देशमुख, जालिंदर वाकचौरे, गिरजाजी जाधव, जे. डी. आंबरे, उत्कर्षा रुपवते, विजय वाकचौरे, भाऊपाटील नवले, डॉ. नितीन चासकर, भानुदास तिकांडे, बाळासाहेब भोर, राजेंद्र देशमुख, राजेंद्र कूमकर, शरद चौधरी, प्रमोद मंडलिक प्रमुख उपस्थित होते. कारखान्याच्या वार्षिक अहवालात संस्थापक, माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांचा फोटो न छापल्याबद्दल त्यांची नात, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांसह आरपीआय कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कारखान्याचे अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांनी, या भावना लक्षात घेवून, पुढील काळात सुधारणा करु, असे सांगितले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सिताराम पाटील गायकर म्हणाले की, ‘ऊस तोड कामगारांना अगस्ती कारखान्याने वेळेत अॅडव्हान्स न दिल्यास ते इतर कारखान्यांकडे उस तोडीसाठी निघून जातील. यामुळे मोठी अडचण होईल. जिल्हा सहकारी बँकेवर प्रशासक आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना, ही अडचण निदर्शनास आणून दिली आहे. त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, प्रशासकांना फोन केल्यामुळेच जिल्हा बँकेने कर्ज उपलब्ध करून दिले. यामुळे ऊसतोड मजुरांना उचल दिली आहे. हंगाम सुरळीत होईल. तर आमदार डॉ. किरण लहामटे यांनी कारखान्याचा २०२२ सालामध्ये तोटा कमी करण्याचे आश्वासन दिले, आता तोटा किती कमी केला, हे वास्तव सभासदांना वार्षिक अहवालात दाखवावे. कारखान्यासाठी कर्ज कसे आणायचे, ते आम्ही पाहू, मात्र तालुक्यात उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी अधिकारी वर्गाने लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.


















