अकोला : बालाजी सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे वेतन व उपदानाची मोठी रक्कम अनेक वर्षांपासून थकीत होती. यासंदर्भात तत्कालीन साखर आयुक्त गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली २०२० मध्ये सहायक कामगार आयुक्त, अकोला यांच्याकडे मागणी दाखल करण्यात आली होती. मात्र, कोरोना, लॉकडाउन, प्रशासकीय बदल्या आदी विविध कारणामुळे या प्रकरणात मोठा विलंब झाला. आता सहायक कामगार आयुक्त, अकोला यांनी तब्बल ५ कोटी ५५ लाख ९९ हजार ९२३ रुपयांच्या वसुलीचे आदेश जारी केल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये पगाराचे थकीत ४ कोटी २९ लाख ५१ हजार ४४८ रुपये आणि उपदानाची रक्कम १ कोटी २६ लाख ४८ हजार ४७५ रुपये यांचा समावेश आहे.
कागार आयुक्तांच्या निर्णयामुळे वाशिम जिल्हयातील मसलापेण येथील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. कामगारांना न्याय मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली असे लालबावटा युनियनचे ज्येष्ठ नेते कॉ. देवराव पाटील यांनी सांगितले. या लढ्यात कामगार सेना अध्यक्ष बी. टी. विल्लारी तसेच ज्येष्ठ कामगार नेते कॉ. देवराव पाटील यांनी सातत्यपूर्ण व आक्रमक पाठपुरावा केला. २०२३ पासून पुन्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू करण्यात आली. सहायक कामगार आयुक्त राहुल काळे यांनी प्रकरण गांभीयनि हाताळत कामगारांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला. अवसायक लहाने व सहायक दुबे यांनी सकारात्मक सहकार्य केले. सहकारी कामगार अधिकारी जाधव, वाजुरकर, ठाकूर, संतोष आदींनी सहकार्य केल्याचे कामगार संघटनेने सांगितले.


















