नवी दिल्ली : केंद्र सरकारने 25 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजेच E25 इंधनाचा सध्या वापरात असलेल्या वाहनांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्याची जबाबदारी देशातील प्रमुख वाहन परीक्षण संस्था ‘एआरएआय’कडे सोपवली आहे. या अभ्यासामध्ये वाहनांचे मायलेज, इंजिनची स्थिती आणि कार्यक्षमतेच्या विविध बाबींची तपासणी केली जाणार आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार इथेनॉल मिश्रण वाढवण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या आंतर-मंत्रालयीन बैठकीत भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ने सांगितले की,सध्याच्या 20 टक्के इथेनॉल मिश्रणात आणखी 1 टक्का वाढ करणे फार मोठी समस्या ठरणार नाही. मात्र 25 टक्के मिश्रण हा मोठा बदल असल्याने ‘एआरएआय’ आता E10 आणि E20 मानकांनुसार तयार वाहनांवर सविस्तर अभ्यास करणार आहे. तज्ज्ञांच्या मते, देशात इथेनॉलचा पुरेसा साठा उपलब्ध असला तरी जास्त इथेनॉल मिश्रणासाठी डिझाइन न केलेल्या वाहनांची क्षमता, मायलेज, इंजिनचे आयुष्य, प्रदूषण आणि देखभाल खर्च यांचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. यासाठी वाहनांची 60 हजार ते 70 हजार किलोमीटरपर्यंत चाचणी घेतली जाणार आहे.
इथेनॉल मिश्रण वाढवण्याच्या सरकारी धोरणानंतर वाहन उत्पादक कंपन्यांनी 2010 पासून E10 सुसंगत वाहने तयार करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर 2023 पासून E20 मानकांनुसार वाहने तयार होऊ लागली आणि एप्रिल 2025 पासून सर्व नवीन वाहने E20 इंधन आणि साहित्याशी सुसंगत बनवली जात आहेत.
दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयाने आंतर-मंत्रालयीन समूहाला माहिती दिली की, E85 किंवा त्याहून अधिक इथेनॉल मिश्रित इंधनावरील जीएसटी 15 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची शिफारस वित्त मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांना अशा वाहनांच्या निर्मितीस प्रोत्साहन मिळेल. दोन वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेला हा आंतर-मंत्रालयीन समूह उच्च इथेनॉल मिश्रणासाठी रोडमॅप तयार करण्याचे काम करत असून, तो पुढील आठवड्यात आपला अहवाल सादर करू शकतो. काही वाहन कंपन्या पुढील महिन्यात फ्लेक्स फ्यूल कार आणि बाइक्स बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. ही वाहने अधिक इथेनॉल मिश्रित पेट्रोल तसेच 100 टक्के इथेनॉलवरही चालू शकतील.

















