मुंबई: साखरेचा देशांतर्गत पुरवठा आणि किंमत नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यातीवर घातलेली बंदी योग्यच असल्याचा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने निर्यातदारांना मोठा धक्का दिला. सार्वजनिक आणि राष्ट्रीय हित लक्षात घेऊन सरकारने घेतलेला धोरणात्मक निर्णय न्यायमूर्ती सुमन स्थान आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने वैध ठरवला आणि निर्यातदारांच्या सर्व याचिका फेटाळल्या.
केंद्र सरकारच्या परकीय व्यापार महासंचालनालयाने १३ मे रोजी अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेद्वारे साखरेची निर्यात ‘निर्बंधित’ श्रेणीतून थेट ‘प्रतिबंधित श्रेणीत टाकण्यात आली होती. या निर्णयामुळे साखर निर्यातीवर पूर्णपणे बंदी आली. या निर्णयाविरोधात ‘प्रीमियम शुगर्स आणि इतर व्यापारी कंपन्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकाकर्त्यांनी बंदीपूर्वीच परदेशी खरेदीदारांशी खाजगी करार केले होते आणि त्यांचे आगाऊ पैसेही स्वीकारले होते. त्यामुळे अचानक घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे व्यापा-यांचे म्हणणे होते.
खंडपीठाने व्यापा-यांचा युक्तिवाद फेटाळला आणि लोकांचे कल्याण हाच सर्वोच्च कायदा असल्याचे स्पष्ट केले. २०२५-२६ च्या हंगामात साखरेचे उत्पादन ३४३ लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज होता, परंतु प्रत्यक्षात ते केवळ ३०८ लाख मेट्रिक टन एवढेच झाले. ‘एल निनोंच्या प्रभावामुळे पुढील हंगामात उत्पादनावर परिणाम होईल, असे सरकारने म्हटले होते. त्याची गंभीर नोंद घेत खंडपीठाने साखर निर्यातीवरील बंदी योग्य ठरवली.

















