बीड: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पिंपरखेड येथील ऊस तोडणी कामगाराच्या मुलीने पोलिस भरतीत यश मिळवले आहे. वर्षानुवर्षे उन्हातानात ऊस तोडणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याने ग्रामस्थांनी तिची घोड्यावरून वाजतगाजत मिरवणूक काढली. वैष्णवी विलास शिंदे असे या मुलीचे नाव आहे. रक्ताचे पाणी करून शिकवणाऱ्या माझ्या आई-वडिलांचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया वैष्णवीने दिली.
वैष्णवीने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. तिने या परीक्षेची चांगली तयारी केली. अडचणी आल्या मात्र, त्यावर मात करत यश मिळवले. तिचा आझाद क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश घोडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उपसरपंच तथा पत्रकार अशोक निपटे यांनी वैष्णवीच्या यशाचे कौतुक करत पुढील शिक्षणासाठी सहकार्याचे आश्वासन दिले. बजरंग साबळे, प्रा. प्रकाश खळगे, श्रीनिवास निपटे, गजानन निपटे, रुक्षराज निपटे, विकास शिंदे, एकनाथराव शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


















