बीड : उसाला प्रतिटन पाच हजार रुपये अंतिम दर जाहीर करावा यांसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बुधवारी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यासमोर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी समर्थ कारखान्याचे कार्यकारी संचालक दिलीप पाटील, व्यवस्थापकीय संचालक बी. टी. पावसे आणि जलसंपदा विभागाचे भानुदास शिरसाठ यांना मागण्यांचे निवेदन दिले. करपलेल्या उसाला प्राधान्याने तोड देऊन कोणतीही कपात करू नये, साखरेला प्रतिकिलो ५० रुपये आणि सी-हेवी मोलॅसिसपासून उत्पादित इथेनॉलला प्रतिलिटर ७० रुपये हमीभाव द्यावा, जायकवाडी धरणातून सिंचनासाठी पाच आवर्तने सोडावीत आणि खरीप, फळपीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशाही मागण्या करण्यात आल्या.
आंदोलनावेळी ज्येष्ठ नेते बन्सीधर हातोटे, हभप शिवाजी महाराज भोसले, प्रगतिशील शेतकरी दिलीप हातोटे, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव खोसे, तालुकाध्यक्ष राजेंद्र खटके, गणेश राजबिंडे आणि उपाध्यक्ष पांडुरंग गावडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे म्हणाले, राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. साखरेला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळालाच पाहिजे. जायकवाडीच्या कालवा समितीची बैठक अद्याप झाली नसून पाण्याचे नियोजन रखडले आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मराठवाड्याला सापत्न वागणूक मिळत आहे. पैठण-बिडकीन एमआयडीसीतील प्रस्तावित उद्योगांमुळे शेतीच्या पाण्यावर परिणाम होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.


















