बेळगाव : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने २०२६-२७ या गाळप हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार ७७० रुपये पहिली उचल देण्याची घोषणा केली आहे. कारखान्याचे मार्गदर्शक तथा बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी मंगळवारी (ता. १०) कारखाना कार्यस्थळावर आयोजित बैठकीत ही माहिती दिली.
यावेळी अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की, कारखान्याने आजवर ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांना इतर सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत अधिक दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यंदाही शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार ७७० रुपये पहिली उचल दिली जाणार आहे. याशिवाय गाळप हंगाम संपल्यानंतर अंतिम साखर उतारा ११.५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास प्रतिटन १०० रुपये अतिरिक्त दिले जातील. तसेच साखरेचा सरासरी विक्री दर प्रतिकिलो ५० रुपये राहिल्यास प्रतिटन २०० रुपये, तर विक्री दर ५५ रुपये राहिल्यास प्रतिटन ४०० रुपये अतिरिक्त रक्कम पुढील गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना अदा केली जाणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना अधिक मोबदला मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
कारखान्याने आजवर पारदर्शक कारभार आणि विश्वासाच्या बळावर शेतकरी व ऊस उत्पादक सभासदांचा विश्वास संपादन केला असल्याचेही त्यांनी नमूद केले. कारखान्याचे अध्यक्ष जयकुमार खोत म्हणाले की, अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने सातत्याने प्रगती साधली आहे. यंदाच्या हंगामासाठी जाहीर केलेला ऊसदर सध्याच्या परिस्थितीत सहकारी साखर कारखान्यांमध्ये उच्चांकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीस माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, संचालक जयवंत भाटले, राजू गुंदेशा, सुहास गुगे, रावसाहेब फराळे, डॉ. सुदर्शन मुराबट्टे, बाळासाहेब कदम यांच्यासह कारखान्याचे संचालक, हितचिंतक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


















