पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा आणि पॉलिस्टरच्या दरवाढीमुळे कापसाच्या भावात वाढ झाली आहे. ‘सीसीआय’ने कापसाच्या विक्रीदरात खंडीमागे ३७०० रुपयांची वाढ केली आहे. सध्या खुल्या बाजारात कापसाला सरासरी ८१०० ते ८७०० रुपये दर मिळत असून बाजारातील आवक कमी असल्याने पुढील काही दिवस भाव मजबूत राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.देशातील बाजारात मागील काही दिवसांत सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसून येत आहे. तेलासाठी वाढलेली मागणी आणि शेजारील देशांमध्ये सोयापेंड निर्यात चांगली सुरू असल्याने बाजाराला आधार मिळत आहे. सध्या सोयाबीनला ५२०० ते ५६०० रुपये दर मिळत आहे.
नव्या हळदीची आवक हळूहळू वाढत असली तरी उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. सण-समारंभांमुळे मागणी कायम असूनही नव्या मालाच्या आवकेमुळे दरांवर दबाव आहे. सध्या हळदीला गुणवत्तेनुसार १०,००० ते १४,००० रुपये दर मिळत आहे. पुढील काळात आवक वाढल्यास दरात काहीशी नरमाई येऊ शकते, असा अंदाज आहे.
देशातील बाजारात बेदाण्याचे दर सध्या तेजीत आहेत. रमजान आणि लग्नसराईमुळे मागणी वाढल्याने दरातही वाढ झाली आहे. निर्यातीवर काहीसा परिणाम झाला असला तरी देशांतर्गत मागणी मजबूत आहे. सध्या बेदाण्याला गुणवत्तेनुसार १५० ते ३०० रुपये प्रति किलो दर मिळत आहे. पुढील ३ महिने मागणी चांगली राहण्याची शक्यता असून आवक मर्यादित राहिल्यास दर टिकून राहतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.















