खरीप 2026-27 साठी मक्याच्या ‘एमएसपी’मध्ये प्रति क्विंटल 10 रुपये वाढ; केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत खरीप विपणन हंगाम 2026-27 साठी मक्याचा किमान आधारभूत किंमत (एमएसपी) 2410 रुपये प्रति क्विंटल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मागील हंगामात मक्याची एमएसपी 2400 रुपये प्रति क्विंटल होती. यंदा त्यात 10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या माहितीनुसार, मक्याच्या उत्पादनाचा खर्च 1544 रुपये प्रति क्विंटल इतका निश्चित करण्यात आला आहे. नव्या एमएसपीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर सुमारे 56 टक्के नफा मिळणार आहे. खरीप पिकांमध्ये शेतकऱ्यांना अधिक परतावा देणाऱ्या पिकांमध्ये मका हे प्रमुख पीक ठरत आहे. फक्त मूगाला 61 टक्के आणि बाजरीला मक्यासमान 56 टक्के नफा मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

2013-14 पासून आतापर्यंत मक्याच्या एमएसपीमध्ये 1100 रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ झाली असून, ही वाढ सुमारे 84 टक्के आहे. शेतकऱ्यांना लाभदायक दर मिळवून देण्याच्या सरकारच्या धोरणाचा हा भाग असल्याचे सरकारने म्हटले आहे.केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 मध्ये उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट एमएसपी निश्चित करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसारच ही वाढ करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.सरकारने खरीप हंगाम 2026-27 साठी एकूण 14 खरीप पिकांच्या सुधारित ‘एमएसपी’ला मंजुरी दिली आहे.यामध्ये सूर्यफूल बियाण्याच्या एमएसपीमध्ये सर्वाधिक 622 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली असून, त्यानंतर कापसाच्या ‘एमएसपी’मध्ये 557 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here