नवी दिल्ली : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या साखरेच्या उपलब्ध साठ्याच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने’ ४८ लाख टन साखरेच्या तफावतीचा हिशेब देण्याची मागणी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे ही मागणी केली आहे.
साखरेच्या साठ्याच्या आकडेवारीवर सवाल
राजू शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर २०२५ अखेर देशात ४७ लाख टन साखरेचा साठा असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले होते. त्यानंतर २०२५-२६ गाळप हंगामात २९१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. त्यामुळे एकूण उपलब्ध साखरेचा साठा ३३८ लाख टनांवर पोहोचला. यापैकी ८ लाख टन साखरेची निर्यात झाली. तसेच १ नोव्हेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी सरकारने २४७ लाख टन साखरेला परवानगी दिली होती.दरम्यान, ३० ऑगस्टपर्यंत ८३ लाख टन साखर शिल्लक असल्याचेही सरकारी आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.
४८ लाख टनांची तफावत नेमकी कुठे?
केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या माहितीनुसार, सप्टेंबरअखेर देशात ३५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. या सर्व आकडेवारीचा ताळमेळ घातल्यास साखरेच्या हिशेबात तब्बल ४८ लाख टनांची तफावत दिसून येत असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे. “४८ लाख टनांची ही तफावत नेमकी कुठे आहे, याचा केंद्र सरकारने स्पष्ट खुलासा करावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
अवैध निर्यात आणि साठेबाजीचा संशय
साखरेच्या या तफावतीबाबत शेट्टी यांनी काही गंभीर शक्यताही व्यक्त केल्या आहेत. पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशात साखरेची बेकायदा निर्यात झाली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.याशिवाय व्यापारी किंवा साठेबाजांनी मोठ्या प्रमाणावर साखर लपवून ठेवली असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील साखरेच्या उपलब्ध साठ्याची पारदर्शक आणि सविस्तर माहिती जाहीर करावी तसेच ४८ लाख टनांच्या कथित तफावतीचा स्पष्ट हिशेब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

















