नवी दिल्ली : केंद्र सरकारने काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या, सर्वोच्च न्यायालयात E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) कार्यक्रमाला “सुरू असलेला प्रयोग” (Ongoing Experiment) असे संबोधल्याच्या वृत्तांचे स्पष्टपणे खंडन केले आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयाने मंगळवारी प्रसिद्धीपत्रक जारी करून या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे म्हटले आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारताचे ॲटर्नी जनरल यांच्या कार्यालयाने 30 जून 2026 रोजी स्पष्ट केले की, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) यांच्या इथेनॉल वाटपाशी संबंधित विशेष अनुमती याचिकेच्या (SLP) सुनावणीबाबत काही माध्यमांनी न्यायालयातील मांडणीचा चुकीचा अर्थ लावला. काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, ॲटर्नी जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की सरकारचा E20 कार्यक्रम हा अजूनही “सुरू असलेला प्रयोग” असून त्याचे परिणाम पुढील वर्षी स्पष्ट होतील. मात्र, केंद्र सरकारने हे दावे पूर्णपणे फेटाळून लावत न्यायालयात अशी कोणतीही मांडणी करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले.
प्रसिद्धीपत्रकानुसार, सुनावणीदरम्यान ॲटर्नी जनरल यांनी न्यायालयाला सांगितले की डेडिकेटेड इथेनॉल प्लांट्सना इथेनॉल वाटपासंदर्भातील समान स्वरूपाच्या अनेक रिट याचिका विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. या सर्व प्रकरणांमधील समान कायदेशीर प्रश्नांचा एकत्रित विचार व्हावा, विरोधाभासी निर्णय टाळता यावेत आणि समांतर सुनावण्या होऊ नयेत यासाठी ही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यासाठी ट्रान्सफर याचिका दाखल करण्यात येत आहेत. तसेच, या सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी झाल्यास राष्ट्रीय इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रमाअंतर्गत तेल विपणन कंपन्यांना (OMCs) वर्षभर 20 टक्के इथेनॉल मिश्रणासाठी आवश्यक इथेनॉलचा पुरवठा अखंडित राहील, असेही ॲटर्नी जनरल यांनी न्यायालयात नमूद केले.
या मांडणीची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित ट्रान्सफर याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच, सध्या न्यायालयासमोर असलेल्या प्रकरणात 2025-26 या इथेनॉल पुरवठा वर्षासाठी इथेनॉल वाटपाबाबत जैसे थे (Status Quo) स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने स्पष्ट केले की, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रम किंवा E20 उपक्रमाला कोणत्याही टप्प्यावर “प्रयोग” असे संबोधलेले नाही. अशा प्रकारचे सर्व दावे चुकीचे असून ते भारत सरकारने न्यायालयात मांडलेल्या अधिकृत भूमिकेचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असेही सरकारने स्पष्ट केले.

















