नवी दिल्ली : केंद्र सरकारने खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत) OMSS (D) आर्थिक वर्ष 2026-27 साठी ई-लिलावाद्वारे तांदूळ विक्रीचे उद्दिष्ट 25 लाख मेट्रिक टनांवरून दुप्पट करून 50 लाख मेट्रिक टन केले आहे. देशात तांदळाचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करणे आणि किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय, देशभरातील तांदूळ आणि धानाचा व्यापार करणारे सर्व व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठ्या रिटेल साखळ्या तसेच प्रक्रिया उद्योग आणि राइस मिलर्स यांना साठ्याची साप्ताहिक माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित घटकांना दर शुक्रवारी अन्नधान्य साठा पोर्टलवर आपल्या साठ्याची माहिती अद्ययावत करावी लागणार आहे.
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या माहितीनुसार, साठेबाजी रोखणे, देशांतर्गत बाजारात तांदळाची पुरेशी उपलब्धता राखणे आणि अन्नधान्याच्या किमतींवर नियंत्रण ठेवताना ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करणे हा या उपाययोजनांचा उद्देश आहे. 6 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, साठा असलेल्या सर्व घटकांना सहा प्रकारांमध्ये साठ्याची माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये बासमती तांदूळ, बिगर बासमती प्रीमियम तांदूळ, बिगर बासमती तांदूळ, उकडा तांदूळ, तुकडा तांदूळ आणि धान या श्रेणींचा समावेश आहे. पोर्टलवर नोंदणी न करणाऱ्या किंवा निर्धारित साठा मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या घटकांवर अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 मधील कलम 6 आणि 7 अंतर्गत योग्य ती दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
पाच राज्यांना तांदूळ आणि धानाच्या साठ्यावर मर्यादा घालण्याची परवानगी
आणखी एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, केंद्र सरकारने आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांना आवश्यकतेनुसार तांदूळ आणि धानाच्या साठ्यावर मर्यादा लागू करण्यास सहमती दिली आहे. संबंधित राज्य सरकारांकडून योग्य ते नियंत्रण आदेश जारी करून हे निर्बंध 31 जानेवारी 2027 पर्यंत लागू ठेवता येणार आहेत. बाजारात तांदळाची उपलब्धता कायम राखणे तसेच साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून या अंमलबजावणीवर देखरेख ठेवली जाणार आहे.
भारत तांदळाच्या वितरणात वाढ करण्याचा निर्णय
देशभरात, विशेषतः दक्षिण भारतातील राज्यांमध्ये भारत तांदळाची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED), भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) आणि केंद्रीय भांडार यांना अतिरिक्त तांदूळ वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात तांदूळ उपलब्ध करून देण्यासाठी आणि किरकोळ बाजारातील किमती नियंत्रित ठेवण्यास मदत व्हावी, यासाठी या संस्थांना वितरणाचे अतिरिक्त मार्ग शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत तांदूळ विक्रीत मोठी वाढ
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (OMSS-D) ई-लिलावाद्वारे खासगी व्यापाऱ्यांना 25 लाख मेट्रिक टन तांदळाची विक्री करण्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत 11 लाख मेट्रिक टन तांदळाची विक्री झाली होती. आवश्यक अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा कायम राखणे, साठेबाजीला आळा घालणे आणि देशांतर्गत बाजारातील किमती स्थिर ठेवणे यासाठी सरकारचे प्रयत्न या उपाययोजनांमुळे अधिक बळकट होतील, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.


















