नवी दिल्ली : केंद्र सरकारला इथेनॉल केवळ पेट्रोलमध्ये मिसळण्यापुरते मर्यादित ठेवायचे नाही. इथेनॉलला देशाच्या ऊर्जा सुरक्षेचा एक मजबूत आधारस्तंभ बनवणे, हे त्यांचे ध्येय आहे. इथेनॉलच्या विविध उपयोगांना प्रोत्साहन देण्यावर गांभीर्याने विचार केला जात आहे असे अलीकडील आंतर-मंत्रालयीन चर्चांमधून स्पष्टपणे दिसून येते, असे ‘झी न्यूज हिंदी’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. इथेनॉल मिश्रण करणे, तसेच स्वयंपाक आणि भट्ट्यांमध्ये वापरास परवानगी देणे, एलपीजीला पर्याय उपलब्ध करून देणे आणि फ्लेक्स-फ्यूएल वाहनांना प्राधान्य देणे, ही सर्व अशी पावले आहेत जी एकाच वेळी ऊर्जा सुरक्षा मजबूत करतील. सरकार सध्या फ्लेक्स-फ्यूएल वाहनांना प्राधान्य देत आहे. ही वाहने २०% ते ८५% पर्यंत इथेनॉल मिश्रण असलेले इंधन वापरू शकतात. वाहन कंपन्यांना ही वाहने बाजारात आणण्याची परवानगी देण्यासाठी लवकरच धोरणात बदल अपेक्षित आहे.
सरकारने दोन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित आहे. यापैकी पहिले म्हणजे, पेट्रोलियम आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि दुसरे, देशांतर्गत कृषी इंधनांना मुख्य प्रवाहात आणणे. या उद्देशाने, इथेनॉल मिश्रणाला आणि त्याचा घरगुती स्वयंपाक व औद्योगिक भट्ट्यांमध्ये वापर करण्यास मंजुरी देण्याची शक्यता आहे. इथेनॉलला एलपीजीचा एक स्वस्त आणि स्वदेशी पर्याय बनवण्यासाठी उद्योगांसोबत चर्चाही सुरू आहे. त्यामुळे केवळ आयातीवरील खर्चच कमी होणार नाही, तर शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे मार्गही खुले होतील. इथेनॉल मिश्रण वाढविण्याबाबत कोणताही निर्णय घाईने घेतला जाणार नाही. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय)च्या अहवालाची प्रतीक्षा आहे. हा अहवाल इथेनॉल मिश्रणाचा इंजिन, प्रदूषण नियंत्रण आणि वाहनाच्या कार्यक्षमतेवर होणाऱ्या परिणामाचे परीक्षण करेल. मिश्रणाची टक्केवारी वाढवण्याबाबतचा अंतिम निर्णय अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतरच घेतला जाईल. सूत्रांनुसार, नोव्हेंबरपूर्वी सर्व तरतुदींना अंतिम स्वरूप दिले जाईल, असेही ‘झी न्यूज’च्या वृत्तात म्हटले आहे.

















