छत्रपती संभाजीनगर : येथील छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याच्या २६ व्या गळीत हंगामाची सुरुवात राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बुधवारी झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅचरल शुगरचे अध्यक्ष तथा कारखान्याचे संचालक बी.बी. ठोंबरे होते. कारखान्याचे संचालक राम भोगले, बळिराम उकर्डे, देवजीभाई पटेल, प्रकाश काकडे, रवींद्र दाबशेटवार, प्रल्हाद पन्हाळे, किशोर शितोळे, बाजार समितीचे सभापती श्रीराम शेळके, जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष रामराव शेळके आणि कारखान्याचे उपाध्यक्ष दामोदर नवपुते, संतोष गावंडे, भागचंद ठोंबरे आदींच्या हस्ते गव्हाणीचे पूजन झाले.
यंदा पाऊस नसल्याने उसाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उसाचे वजन कमी येणार असून, त्याचा परिणाम साखरेच्या उताऱ्यावर होईल. तरीही काटकसरीने व्यवहार करून छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांना चांगला भाव देण्याचा प्रयत्न करू. कारखान्याने तीन लाख ५० हजार टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यातर्फे मागील वर्षापेक्षा चांगला भाव देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगण्यात आले. कारखान्याचे अधिकारी नानासाहेब कुंटे, अमोल सोहळे, बाळासाहेब बागडे, केदारे, योगेश ठोंबरे, अक्षय कुलकर्णी आदींनी स्वागत केले. आमदार नारायण कुचे, किशोर शितोळे, प्रल्हाद पन्हाळे, देवजीभाई पटेल आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मुख्य लेखाधिकारी शिवाजी टकले यांनी केले. तर जनरल मॅनेजर दिगंबर बडदे यांनी आभार मानले.

















