छत्रपती संभाजीनगर : कारखान्यांकडून ‘एफआरपी’ जाहीर होण्याची गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यासह परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून उसाची वाढ खुंटली आहे. परिणामी, उसाच्या उताऱ्यात मोठी घट येण्याचा अंदाज आहे. तालुक्यात यंदा गाळपासाठी उपलब्ध असलेले उसाचे क्षेत्र ११ हजार ३३३ हेक्टर असून, नवीन लागवड ४ हजार ५५३ हेक्टरवर झाली आहे. दुष्काळामुळे शेतकरी उसाला मिळणाऱ्या चांगल्या भावावर आशा लावून बसला आहे. मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातून ऊसतोड मजुरांच्या टोळ्या गाड्या-बैलांसह दाखल झाल्या आहेत. मात्र, गळीत हंगाम सुरू होऊनही साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर न केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी संघटनांनी याप्रश्नी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची तयारी चालवली आहे.

तालुक्यातील गोदावरी पट्टयासह परिसरात सध्या गळीत हंगामाला आणि ऊसतोडणीला जोमाने सुरुवात झाली आहे. धामोरी येथील मुक्तेश्वर शुगर, जामगाव येथील जयहिंद शुगर आणि महालगाव येथील पंचगंगा शुगर यांसह बाहेरून आलेल्या कोळपेवाडी, प्रवरा, भेंडा, वांबोरी, कन्नड, सोनई, संगमनेर, बारामती अॅग्रो व गणेशनगर आदी कारखान्यांच्या टोळ्यांनी ऊस तोडणी सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे यांनी कारखान्यांनी दर जाहीर न करताच उसावर दरोडा घालण्याचे काम सुरू केले आहे असा आरोप केला. तर शेतकरी नेते वाल्मिक शिरसाठ यांनी यंदा दुष्काळामुळे कारखाने महिनाभर अगोदर सुरू झाले आहेत, मात्र दर निश्चित नाही. कारखान्यांनी तत्काळ दर जाहीर करावेत अशी मागणी त्यांनी केली. भाऊसाहेब शेळके यांनी कारखानदार आणि सरकारने उसाचा भाव न ठरवता शेतकऱ्यांची उघड लूट चालवली आहे असा आरोप केला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here