छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील शिरसगाव नात वस्तीजवळ महावितरणच्या डीपीवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे २० एकर उभा ऊस जळून खाक झाला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच आमदार रमेश बोरणारे यांनी घटनास्थळाची भेट देवून पाहणी केली. ग्राम महसूल अधिकारी राशेद शेख, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यात आला. तर दिन्नापूर शिवारातही अशीच घटना घडली. यामध्ये अडीच एकरातील ऊस जळाला. या घटनेदरम्यान, तरुणांनी तत्परता दाखवल्याने सुमारे दहा एकरातील ऊस वाचवण्यात यश मिळाले.
शिरसगाव नात वस्तीजवळील आगीच्या दुर्घटनेत शिवाजी काळे, ताराचंद काळे, साहेबराव काळे, माणिकराव काळे, अर्जुन काळे, बद्रीनाथ शिरसाट, रावण शिरसाट, मिनाबाई शिरसाट, लक्ष्मीबाई शिरसाट, अलका शिंदे, किरण काळे, अशोक शिरसाट, नवनाथ काळे, चक्रधर शिरसाट, नंदू कान्हे, दादासाहेब शिरसाट, कैलास काळे यांच्यासह एकूण १२ शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला. जळालेल्या उसाचे तातडीने गाळप करण्यासाठी पंचगंगा शुगर (महालगाव) कारखान्याचे चेअरमन प्रभाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, लोहगाव परिसरातील दिन्नापूर शिवारात मंगळवारी सायंकाळी कैलास गायकवाड यांच्या उसाला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत कैलास गायकवाड व राजू खाटीक या दोन्ही शेतकऱ्यांचे मिळून सुमारे अडीच एकर ऊस जळून नुकसान झाले. तर आगीची माहिती मिळताच गावातील तरुणांनी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत घटनास्थळी धाव घेतली. तरुणांनी अथक प्रयत्न करून उसामध्ये वाटा निर्माण करून आगीवर नियंत्रण मिळविले. तरुणांच्या तत्परतेमुळे शेजारील १० ते १२ एकर ऊस पिकाचे मोठे नुकसान टळले.

















