छत्रपती संभाजीनगर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव दर मिळावा, या मागणीवरून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. ऊसदरवाढीच्या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी कन्नड येथील बारामती ॲग्रो कारखान्याची गव्हाण बंद पाडली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी, आमदार प्रशांत बंब, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि कारखानदार यांच्यात बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.याच पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसदरवाढीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. तब्बल साडेचार तास चाललेल्या या बैठकीत ऊसदरावर सविस्तर चर्चा झाली. मात्र, पंचगंगा शुगर वगळता एकाही कारखान्याने अपेक्षित वाढीव पहिली उचल देण्याची तयारी दर्शवली नाही. त्यामुळे ही बैठक कोणत्याही ठोस निर्णयाविना संपली.
कोणत्या कारखान्याने किती जाहीर केली पहिली उचल?
या बैठकीला जिल्ह्यातील पाच सहकारी आणि पाच खासगी अशा एकूण दहा साखर कारखान्यांचे चेअरमन, व्यवस्थापक, जनरल मॅनेजर, ऊस पुरवठा अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.यामध्ये संत एकनाथ सहकारी साखर कारखाना (पैठण), रेणुकादेवी शुगर (विहामांडवा), बारामती ॲग्रो (कन्नड), छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग, मुक्तेश्वर शुगर (धामोरी, गंगापूर), जय हिंद शुगर (गंगापूर), पंचगंगा शुगर (महालगाव, वैजापूर), देवगिरी सहकारी साखर कारखाना (फुलंब्री), घृष्णेश्वर शुगर (गदाना) आणि खडकपूर्णा ॲग्रो (सिल्लोड) यांचा समावेश होता.
बैठकीदरम्यान काही प्रमुख कारखान्यांनी आपापली पहिली उचल जाहीर केली. संत एकनाथ कारखान्याने एफआरपी २,४९० रुपये असल्याचे सांगत २,९०० रुपयांपेक्षा अधिक पहिली उचल देणे शक्य नसल्याची भूमिका घेतली.मुक्तेश्वर शुगरने ३,१०० रुपये, बारामती ॲग्रोने ३,२११ रुपये, तर छत्रपती संभाजीराजे कारखान्याने ३,००१ रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर केली. मात्र, पंचगंगा शुगरने प्रतिटन ३,३१५ रुपये रुपयांची पहिली उचल जाहीर करून सर्वांचे लक्ष वेधले. वाढीव पहिली उचल जाहीर करणारा हा एकमेव कारखाना ठरला.इतर कारखानदारांनी ऊसदराचा अंतिम निर्णय घेण्यासाठी जानेवारी महिना उलटू द्यावा, त्यानंतर दराबाबत विचार करू, अशी भूमिका घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना अंतिम ऊसदर समजण्यासाठी आणखी एक ते दीड महिना प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
शेतकरी संघटनांची पहिली उचल ३,३०० रुपयांची मागणी
जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांनी सर्व साखर कारखान्यांनी प्रतिटन किमान ३,३०० रुपये पहिली उचल द्यावी, अशी मागणी बैठकीत केली होती. मात्र, कारखानदारांनी वेगवेगळे दर जाहीर केल्याने शेतकऱ्यांच्या मागणीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.पंचगंगा शुगरने ३,३१५ रुपये दर देण्याची घोषणा केली. यामध्ये सुरुवातीला ३,२०० रुपये आणि त्यानंतर प्रत्येकी १०० रुपयांचे हप्ते देण्याचे नियोजन असल्याची माहिती कारखान्याचे संचालक कॅप्टन प्रशांत माने आणि चेअरमन प्रभाकर शिंदे यांनी दिली.
दरम्यान, जळालेल्या उसाच्या दराबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच दुसऱ्या काट्यावर वजन केलेल्या उसाची खरेदी काही कारखानदारांकडून केली जात नसल्याचा आरोपही शेतकरी प्रतिनिधींनी बैठकीत केला. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आणि साखर सहसंचालक विशाल जाधवर उपस्थित होते.
१५ दिवसांत पुन्हा बैठक; रिकव्हरीची पडताळणी होणार
बारामती ॲग्रोच्या प्रतिनिधींनी बैठकीदरम्यान, ‘ज्यांना शक्य आहे त्यांनीच आमच्या कारखान्याला ऊस द्यावा,’ अशी भूमिका मांडल्याने आपण नाराज झाल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले.पहिली उचल जाहीर करायची नसेल तर करू नये; मात्र अशा प्रकारचे वक्तव्य करून कारखान्यांनी शेतकऱ्यांचा अवमान करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या मागील आणि चालू हंगामातील साखर उताऱ्याची सहकार विभागामार्फत पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष रिकव्हरीच्या आधारे पहिल्या उचलीबाबत निर्णय घेतला जाईल. यासाठी १५ दिवसांनंतर पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले.
‘शेतकरी टिकला तरच आपण टिकू’; पंचगंगा शुगरची भूमिका
जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. पुढील वर्षी सुपर एल निनोचे भाकीतही वर्तवण्यात आले आहे. ज्या ठिकाणी पूर्वी ५० टन ऊस उत्पादन होत होते, तिथे आता केवळ २५ टन उत्पादन मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.’शेतकरी टिकला तरच आपण टिकू,’ हे आमच्या कारखान्याचे धोरण आहे. माझ्या कारखान्याचे कर्ज पूर्णपणे फेडण्यासाठी अजून दहा वर्षे लागतील. मात्र, शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिला पाहिजे, या भूमिकेतून आम्ही वाढीव पहिली उचल जाहीर केली आहे, असे पंचगंगा शुगरचे चेअरमन प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले.

















