छत्रपती संभाजीनगर : उसाला प्रतिटन ४,२०० रुपये दर द्या; बारामती ॲग्रोसमोर बळिराजा संघटनेचे धरणे आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : उसाला प्रतिटन ४,२०० रुपये दर जाहीर करावा, तसेच मागील गळीत हंगामातील उसाची थकीत बिले तातडीने अदा करावीत, या मागण्यांसाठी अखिल भारतीय बळिराजा संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. १३) सकाळी बारामती ॲग्रो साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक २ च्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

कारखाना प्रशासनाला २२ ऑक्टोबर रोजी निवेदन देऊनही मागण्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने संघटनेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. साखर उताऱ्यानुसार (रिकव्हरी) उसाला प्रतिटन ४,२०० रुपये दर द्यावा, २५ किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या ऊस वाहतुकीचा अतिरिक्त खर्च स्थानिक शेतकऱ्यांवर लादू नये, मागील हंगामातील साखरेच्या वाढीव दरापोटी प्रतिटन ३०० रुपये द्यावेत, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या.

ChiniMandi WhatsApp Channel

याशिवाय मोलॅसिस आणि बगॅस या उपउत्पादनांमधून मिळणाऱ्या नफ्यात शेतकऱ्यांना योग्य वाटा द्यावा, तसेच दिवाळीपूर्वी प्रत्येक सभासदाला २५ किलो साखर मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

मागण्या तातडीने मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय बळिराजा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती डक आणि जिल्हाध्यक्ष सुखदेव कदम यांनी दिला. सुमारे दोन तास चाललेल्या ठिय्या आंदोलनानंतर कारखान्याचे प्रतिनिधी नरोडे यांनी आंदोलनस्थळी येऊन संघटनेचे निवेदन स्वीकारले.

आंदोलनात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव पाटील, सिद्धेश्वर झाल्टे, गीताराम पवार, बाबासाहेब पवार, गणेश निकम, काकासाहेब कवडे, साहेबराव राठोड, शाम मिसाळ, गोरख लासनकर यांच्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here