छत्रपती संभाजीनर : संत एकनाथ साखर कारखाना कर्ज घोटाळा प्रकरणी कामगार ठेकेदाराला अटक

छत्रपती संभाजीनर : पैठण तालुक्यातील श्रीसंत एकनाथ सहकारी साखर कारखाना करार पद्धतीने चालविणारे घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सचिन घायाळ यांनी कारखान्याची मालमत्ता बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडे गहाण ठेवून तीस कोटी रुपये कर्ज घेतले आहे. यापैकी १६ कोटी ६२ हजार रुपये घोटाळा झाल्याचे उघड झाल्याने सचिन घायाळ यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्याचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. याप्रकरणी घायाळ यांना आठ मोबाईल सिमकार्ड पुरविणाऱ्या लेबर ठेकेदाराला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि.१७) अटक केली. रवींद्र हरिश्चंद्र थोटे (वय ३० रा. पिंपळवाडी ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे.

संशयित ठेकेदार रवींद्र थोटे याला एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या पथकाने न्यायलयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या पैठणसह, अहिल्यानगर, जालना, बीड, पुणे, छत्रपती संभाजीनगर या परिसरात सचिन घायाळ यांचा शोध घेतला जात आहे. गुन्हा दाखल झाला तेव्हापासून घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सचिन घायाळ यांनी अनेकवेळा अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला. जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यामुळे ते सध्या फरार आहेत. आता घायाळ यांना सहकार्य करणाऱ्याचा, वास्तव्याची व्यवस्था करून संपर्कासाठी वेगवेगळ्या कंपनीचे आठ मोबाईल सिमकार्ड पुरविणाऱ्या रवींद्र थोटे याला छत्रपती संभाजीनगर येथून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मधुकर मोरे यांनी अटक केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here