गाळप हंगाम 2026-27 : राज्यात 18 नोव्हेंबरअखेर 178 साखर कारखाने सुरु, 218.52 लाख क्विंटल साखर उत्पादन

कोल्हापूर : राज्यात 18 नोव्हेंबरअखेर 178 साखर कारखाने सुरु झाले आहेत. या सर्व कारखान्यांनी मिळून आतापर्यंत 250.25 लाख टन उसाचे गाळप करून 218.52 लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्याचा सरासरी साखर उतारा 8.73 टक्के इतका आहे. राज्यात सध्या 87 सहकारी आणि 91 खाजगी कारखाने सुरु झाले आहेत. मागील हंगामातही 18 नोव्हेंबरपर्यंत 178 साखर कारखाने सुरु झाले होते. त्यामध्ये 88 सहकारी आणि 90 खाजगी कारखान्यांचा समावेश होता.

कोल्हापूर विभागात गाळप हंगामाला गती आली आहे. सध्या विभागात 35 कारखाने सुरु आहेत. त्यामध्ये 24 सहकारी आणि 11 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. विभागात 39.36 लाख टन उसाचे गाळप होऊन 37.99 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा उतारा राज्यात सर्वाधिक 9.65 टक्के इतका आहे. चांगल्या दरामुळे कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांचाही महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे ऊस पाठवण्याकडे कल पाहायला मिळत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

पुणे विभागात 28 कारखाने सुरु झाले असून त्यामध्ये 17 सहकारी आणि 11 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. विभागात तब्बल 64 लाख टन उसाचे गाळप झाले असून 60.96 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा उतारा 9.52 टक्के आहे. पुणे विभाग उताऱ्यात कोल्हापूर विभागापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे.सोलापूर विभागात सर्वाधिक 41 साखर कारखाने सुरु झाले आहेत. त्यामध्ये 14 सहकारी आणि 27 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व कारखान्यांनी आतापर्यंत 50.01 लाख टन उसाचे गाळप करून 40.07 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. विभागाचा सरासरी उतारा 8.01 टक्के इतका आहे.

नांदेड विभागात 29 कारखाने सुरु झाले असून त्यामध्ये 9 सहकारी आणि 20 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. कारखान्यांनी 32.93 लाख टन उसाचे गाळप करून 26.44 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 8.03 टक्के आहे. अहिल्यानगर विभागातील 24 कारखान्यांनी गाळप सुरु केले आहे. त्यामध्ये 10 सहकारी आणि 14 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. 8.58 टक्के उताऱ्यासह कारखान्यांनी 35.93 लाख टन ऊस गाळप करून 30.84 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात 18 कारखाने सुरु झाले आहे. त्यामध्ये 9 सहकारी आणि 9 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व कारखान्यांनी आतापर्यंत 25.09 लाख टन उसाचे गाळप करून 19.89 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा 7.93 टक्के इतका आहे. अमरावती विभागात 3 खाजगी कारखाने सुरु असून आतापर्यंत 2.93 लाख टन उसाचे गाळप होऊन 2.33 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी उतारा 7.95 टक्के आहे. नागपूर विभागात अद्याप एकही कारखाना सुरु झाला नसल्याचे दिसते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here