पुणे : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या ११ महिन्यांत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील साखर वाहतुकीतून २१० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवला आहे. या कमाईमुळे रेल्वे मालवाहतुकीत झालेली लक्षणीय वाढ दिसून येते. यात वाहन उद्योग, पेट्रोलियम उत्पादने, रेल्वे साहित्य आणि कांदा यांचाही समावेश आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, १ एप्रिल २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत या विभागाने ७.९२ लाख टन साखरेची वाहतूक केली, ज्यातून २१०.४९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. मालवाहतूक महसुलात साखरेचा सर्वाधिक वाटा असून, यामागे उच्च उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर रेल्वे वाहतुकीकडे वळलेला कल हे प्रमुख कारण मानले जात आहे. एकूणच, पुणे विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील विविध लोडिंग केंद्रांमधून १,४४१ रेक हाताळले. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी खर्चात बचत, विश्वासार्हता आणि उत्तम लोडिंग सुविधा यामुळे आपल्या उत्पादनाच्या वाहतुकीसाठी रेल्वेला प्राधान्य दिले.
वाहन उद्योग हा आणखी एक महत्त्वाचा घटक ठरला असून, ५९३ रेकमधून २.१७ लाख टनांहून अधिक मालाची वाहतूक होऊन ९८.१८ कोटी रुपयांची कमाई झाली. पेट्रोलियम उत्पादनांमध्ये २५० रेकद्वारे सुमारे ६.४४ लाख टन मालाची वाहतूक होऊन ३७.१५ कोटी रुपये महसूल मिळाला.रेल्वे साहित्याच्या वाहतुकीत २०९ रेकमधून सुमारे २.९७ लाख टन माल हलवण्यात आला, ज्यातून १५.५७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर १४ रेकमधून २५,६७६ टन कांद्याची वाहतूक करून ३.३२ कोटी रुपयांची कमाई झाली.
चिंचवड, खडकी आणि लोणी येथून चारचाकी वाहने इतर राज्यांत पाठवली जातात. बारामती, सांगली आणि सातारा येथून साखर, गूळ आणि फळांची वाहतूक केली जाते. प्रमुख वाहन टर्मिनल्समध्ये कलंबोली (मुंबई), अजनी (नागपूर विभाग), नाशिक रोड (भुसावळ विभाग), दौंड (सोलापूर विभाग) तसेच पुणे विभागातील खडकी, चिंचवड, मिरज आणि लोणी यांचा समावेश आहे.


















