धाराशिव : साखर कारखान्यांना जिल्हा प्रशासनाचे निर्देश; ३०% ऊस, बगॅस आणि मळीचा साठा राखीव ठेवणे बंधनकारक

धाराशिव : आगामी ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ निवारण आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. जिल्ह्यातील सर्व सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी एकूण ऊसतोडणीपैकी किमान ६० ते ७० टक्के ऊसतोडणी मजुरांमार्फत करावी. तसेच एकूण ऊस लागवड क्षेत्रापैकी ३० टक्के ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी राखीव ठेवावा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. याशिवाय, साखर कारखान्यांनी उत्पादित होणाऱ्या बगॅस आणि मळीपैकी प्रत्येकी ३० टक्के साठा दुष्काळ निवारण, पशुधनासाठी चारा आणि पशुखाद्य निर्मितीसाठी राखून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मजुरांमार्फत ऊसतोडणीला प्राधान्य

ChiniMandi WhatsApp Channel

हार्वेस्टरच्या साहाय्याने ऊसतोडणी केल्यास उसाचा हिरवा पाला अर्थात वाढा जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध करून देताना अडचणी निर्माण होऊ शकतात. याउलट, मजुरांमार्फत ऊसतोडणी केल्यास पशुधनासाठी वाढा उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर स्थानिक ऊसतोड मजुरांना रोजगारही मिळतो. या बाबी लक्षात घेऊन आगामी गाळप हंगामात किमान ६० ते ७० टक्के ऊसतोडणी मजुरांमार्फत करण्याचे आणि हार्वेस्टरचा वापर मर्यादित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण ऊस लागवड क्षेत्रापैकी ३० टक्के क्षेत्रावरील ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी राखीव ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. शक्यतो उसाच्या वाढ्याची साठवणूक कारखाना स्तरावर करून दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध होईल, याची दक्षता घेण्यास कारखान्यांना सांगण्यात आले आहे.

वजनकाटे आणि ऊसतोड मजुरांवर नियंत्रणाची गरज

दरम्यान, ऊसतोडणीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ऊस वाळल्याचे कारण सांगून काही ऊसतोड मजूर तसेच कारखान्याशी संबंधित कर्मचारी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी करून त्यांना त्रास देत असल्याचे आरोप आहेत. काही साखर कारखान्यांतील वजनकाट्यांबाबतही शेतकऱ्यांनी शंका व्यक्त केली आहे. इतर ठिकाणच्या वजनाच्या तुलनेत कारखान्यांच्या वजनकाट्यांवर ऊसाचे वजन कमी नोंदवले जात असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे ऊसतोड मजुरांच्या कामकाजावर आणि कारखान्यांतील वजनकाट्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रशासनाने या बाबींवर लक्ष दिल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संभाव्य आर्थिक पिळवणूक रोखण्यास मदत होईल आणि त्यांना दिलासा मिळू शकेल.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here