धाराशिव : यंदाच्या हंगामापासून नॅचरल शुगरकडून साखरनिर्मितीसाठी सल्फरऐवजी कार्बन डायऑक्साइडचा वापर केला जाणार आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे, अशी माहिती अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली. कारखान्यातर्फे ‘नॅचरल गंधक (सल्फर) विरहित साखरेचे उत्पादन घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. साखरनिर्मितीसाठी सल्फरऐवजी आसवनी प्रकल्पांतून मिळणाऱ्या कार्बन डायऑक्साइडचा उपयोग केला जाणार आहे. या प्रक्रियेत कार्यक्षमता सुधारणा आणि उत्पादन खर्च कमी होणार आहे. तसेच बायोगॅस प्रकल्पातील शुद्धिकरणाचा खर्च कमी होणार आहे. हे परिणाम साखर निर्मिती करताना सल्फर डाय ऑक्साईडचा वापर बंद केल्यास मिळणार आहेत, असेही ठोंबरे यांनी सांगितले.
नॅचरल उद्योग समूहाच्या २०२६-२७ या २५व्या गळीत हंगामाचा प्रारंभ शुक्रवारी (ता. ९) होणार आहे. या हंगामात कारखान्यास सर्वाधिक १८६० टन ऊस पुरवठा करणारे ईट (ता. भूम) येथील ऊस उत्पादक शेतकरी अनिल देशमुख आणि विद्याताई देशमुख या दाम्पत्याच्या हस्ते गव्हाण पूजन होणार आहे. साखर उत्पादनाच्या नव्या तंत्राबाबत माहिती देताना ठोंबरे म्हणाले की, साखरनिर्मितीसाठी सल्फरचा वापर होतो. मात्र, बाजारात असलेला सल्फरचा तुटवडा, दरात झालेली प्रचंड वाढ आणि आरोग्यावर होणारा अनिष्ट परिणाम या बाबींवर मात करत ‘नॅचरल शुगर’ने मागील हंगामापासून सल्फरऐवजी काही प्रमाणात कार्बन डायऑक्साइडचा (सीओटू) वापर केलेला आहे. या अनुभवाचा लाभ घेत ‘नॅचरल शुगर’मध्ये यंदाच्या हंगामात साखरनिर्मितीसाठी सल्फरचा वापर केला जाणार नाही. सल्फरमुळे आरोग्यास हानी पोचण्याची शक्यता असल्याने साखर निर्मिती करताना मागील वर्षी ३५-४० टक्के साखर उत्पादनात ‘सीओटू’चा वापर करण्यात आला.


















