धाराशिव : ‘नशिबाचे फासे पलटण्यासाठी केवळ नशिबाची साथ पुरेशी नसते, तर मनगटात जिद्द आणि रक्तात कष्टाची तयारी असावी लागते,’ याचाच प्रत्यय परंडा तालुक्यातील कौडगावच्या दोन् सुपुत्रांनी दिला आहे. एकेकाळी हातामध्ये कोयता घेऊन उसाच्या फडात आई वडिलांना मदत करणाऱ्या महारुद्र दत्तात्रय पाडुळे आणि रत्नाकर दत्तात्रय पाडुळे या दोन सख्ख्या भावांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ‘पोलिस उपनिरीक्षक’ पदाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही बंधू सध्या पोलिस दलात शिपाई म्हणून कर्तव्य बजावत आहेत.
पाडुळे कुटुंबाची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील दत्तात्रय पाडुळे आणि आई पद्मिनी शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. महारुद्र यांनी पोलिस दलात भरती होण्यापूर्वी आपल्या आई-वडिलांच्या खांद्याला खांदा लावून तब्बल ५ वर्षे ऊसतोड मजूर म्हणून कष्ट केले. कष्टाची हीच जाणीव उराशी बाळगून त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही.
२०१४ मध्ये महारुद्र, तर २०१८ मध्ये रत्नाकर पोलिस दलात भरती झाले. त्यांचे ध्येय ध्येय मोठे होते. महारुद्र पाडुळे यांनी पदवीनंतर मुंबईत कर्तव्यावर असताना एका अकॅडमीचे ऑनलाइन मार्गदर्शन घेतले. २०२३ च्या परीक्षेत त्यांनी ६१५ पैकी १९५ वी रैंकिंग मिळवून यश संपादन केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत धाकटे बंधू रत्नाकर यांनीही पहिल्याच प्रयत्नात पीएसआय पदाला गवसणी घातली.


















